माडखोलची ग्रामसभा BDO यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याची मागणी

Edited by: विनायक गावस
Published on: November 01, 2023 19:11 PM
views 64  views

सावंतवाडी : माडखोल गावची ग्रामसभा गटविकास अधिकारी सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली माडखोल गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास २१ नोव्हेंबर 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी ओरोस सिंधुदुर्ग यांच्या कार्यालासमोर उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत माडखोल गावाला एक कोटी ऐंशी लाख एवढा निधी मंजूर आहे. पण मागील ग्रामपंचायतच्या कालखंडात यावर काहीच हालचाल झाली नाही. यामुळे हा निधी माडखोल गावाला फायदा होणार का असा संशय गावात व्यक्त होत आहे. नवीन बॉडीने 40 वर्षे जुनी निरोपयोगी नळ पाणी योजना दुरुस्त करण्यासाठी या निधीचा वापर करायचा घाट घातला आहे. यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सरपंच माडखोल यांनी आयत्या वेळेच्या विषयात हा विषय घातला व मंजूर केला त्यानंतर मासिक सभेमध्ये सुद्धा अजेंडावर विषय न ठेवता मंजूर केला याला जागरूक नागरिकांनी विरोध केला व ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता ओरोस यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी उदयकुमार महाजनी अधिक्षक अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ओरोस यांनी पंधरा दिवसात ग्रामसभा भरून निर्णय घेण्याचे आदेश दिले. पण सरपंचांनी पंधरा दिवसात ग्रामसभा घेतली नाही व नंतर ही ग्रामसभा ज्या ठिकाणी योजना राबवायचे आहे त्या भागात आयोजित केलीे नाही गावाच्या दुसऱ्या टोकाला आयोजित केली. यालाही ग्रामस्थांनी विरोध केला मग ही ग्रामसभा रद्द करण्यात आली नंतर ही ग्रामसभा ग्रामपंचायत माडखोल या ठिकाणी आयोजित केली  यावर ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्याने हि तहकुब झाली.  सरपंच माडखोल यांच्यावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे ही ग्रामसभा गटविकास अधिकारी सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली माडखोल गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे व मागणी मान्य न झाल्यास21/11/2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी ओरोस सिंधुदुर्ग यांच्या कार्याला समोर उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.