
सिंधुदुर्गनगरी : भोगवे गावातील रस्त्यालगतचे धोकादायक विजेचे खांब स्थलांतर करावे. तसेच सर्व विजेच्या तारांना फायबर व सेफ्टी गार्ड बसविण्यात यावेत. या मागणीसाठी कोचरा येथील प्रसाद करलकर यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे गावातील रस्त्यालगत असलेले विजेचे खांब धोकादायक आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात घडल्यास संबंधित वाहनचालकाला नाहक जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. विद्युत मंडळाच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालकांना भोगावी लागत आहे. यामुळे येथील रस्त्यालगतचे विजेचे खांब स्थलांतर करावेत तसेच विजेच्या तारांना सेफ्टी गार्ड बसविण्यात यावेत. अशी मागणी दोन महिन्यापूर्वी करण्यात आली होती. तसेच आपल्या सांगण्यावरून वायरमेन ला घेऊन भोगवे गावात सर्वे केल्यानंतर पाच खांब स्थलांतरण व गावातील प्रत्येक ठिकाणी फायबर व तारेचे सेफ्टी गार्ड बसविण्याबाबत कळविण्यात आले होते.
यावेळी आपल्याकडून या सर्व त्रुटी लवकरात लवकर दूर करू असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही त्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नाही. तरी भोगवे गावात रस्त्यावर असणाऱ्या विद्युत खांबांमुळे अपघात झाल्यास तसेच विजेचा ताराना सुरक्षा पाळणे नसल्याने अपघात घडल्यास विद्युत महामंडळाला जबाबदार धरण्यात यावे ,वीज वितरण कंपनीच्या चुकीची शिक्षा वाहन चालक अथवा सर्वसामान्य पादचारी नागरिकांना होऊ नये याची खबरदारी घ्यावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज प्रसाद करलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.