पारपोलीतील BSNL टॉवरची नियोजित जागा बदलण्याची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 14, 2024 13:05 PM
views 205  views

सावंतवाडी : पारपोली गावात बीएसएनएलच्या नियोजित टॉवरला ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र, ग्रामपंचायतीने ठराव केलेल्या जागेत नियोजित टॉवर उभारण्यास पारपोली ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे नियोजित टॉवर वस्तीपासून दूर असण्यासाठी या नियोजित टॉवरची सध्याची जागा बदलावी अशी मागणी पारपोली ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे पारपोली ग्रामपंचायतकडे केली आहे.

 याबाबत पारपोली ग्रामस्थांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार पारपोली गावात अनेक वर्षांच्या मागणीनंतर बीएसएनएल टॉवर मंजूर झालेला आहे. मात्र ग्रामस्थांना विश्वासात न घेता या टॉवरची जागा निश्चित करण्यात आली. या ठिकाणी टॉवर उभारल्यास याचा फटका वस्तीसह शेतकरी तसेच बागायतदार याना बसणार आहे. यापूर्वी जिओ कंपनीनेही या ठिकाणी टॉवर उभारण्याचे पत्र ग्रामपंचायतला दिले होते मात्र ग्रामस्थांच्या विरोधानंतर त्यांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध झुगारून टॉवर उभारल्यास या मोबाईल टॉवरच्या कामास ग्रामस्थांचा तीव्र विरोध राहणार आहे. त्यामुळे हा नियोजित टॉवर गावाच्या सिमेलगत ओवळीये पुलाजवळ सर्वे नंबर १२/५ मधील ०.१४ गुंठे या जागेत साकारावा. या ठिकाणी उभारण्यास ग्रामस्थांची कोणतीही हरकत नाही. ग्रामपंचायतीने जुना ठराव रद्द करून या ठिकाणी टॉवर बांधण्याचा ठराव करावा अशी पारपोली ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान, नियोजित टॉवरची सध्याची जागा न बदलल्यास याबाबत लवकरच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे लक्ष वेधून याबाबत पारपोलीवासीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी करणार असल्याचे या निवेदनात स्पष्ट केले आहे. या निवेदनावर पारपोली गावातील राजन परब, दत्ताराम गावकर, चंद्रकांत गावकर, लक्ष्मीकांत गावकर, निवृत्ती परब, एकनाथ परब, राजाराम परब, सोनू गावकर, योजना गावकर, सुप्रिया परब, नूतन परब, गायत्री गावकर, योजना गावकर, रामकृष्ण गावकर, बाबाजी गुरव, सत्यवती गुरव, सोपान परब, भारत गावकर, नारायण गुरव, प्रदीप सावंत, अंकुश नाईक, दत्ताराम नाईक, सावित्री गावकर, रुचिरा परब, लक्ष्मी परब या ग्रामस्थांच्या सह्या आहेत.