कणकवली पोयेकरवाडीमधील 'त्या' अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 13, 2022 16:58 PM
views 177  views

कणकवली : शहरातील पोयेकरवाडी येथे सुभाष श्रीधर भोसले यांनी नगरपंचायत कणकवली यांची कोणतीही परवानगी न घेता सदर ते बांधकाम करत असलेली जागा विराज सुभाष भोसले बांधकाम सभापती नगरपंचायत कणकवली यांच्या उपस्थितीत जेसीबी मशिनच्या सहाय्याने मोकळी केली.

अशा आशयाची तक्रार कणकवली शहरातील पोयेकरवाडीचे रहिवासी रंजन पोयेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या कामामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला होता. सदर चिखल नगरपंचायत कणकवली यांच्या मालकीच्या बंबाने साफ करण्यात आला.


त्यानंतर 'त्या' जागेवर अनधिकृतपणे चिऱ्याचे बांधकाम करायला सुरुवात केली. सदर बांधकाम हे कोणत्याही प्रकारच्या नियमात नसून, ते पूर्णपणे अनधिकृत आहे अशी तक्रार पोयेकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे केली. तसेच यावेळी नगरपंचायतच्या विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

याबाबत पोयेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, या प्रकरणी तक्रार नगरपंचायत कणकवली यांना लेखी दिलेली आहे. तरी सदर अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारे कारवाई केलेली दिसून आली नाही. तसेच सदर बांधकाम तक्रार केल्यानंतरही चालूच आहे.

या बांधकामास कोणत्याही प्रकारे परवानगी घेतलेली नसून, ते आज 12 सप्टेंबर पर्यंत पूर्णत्वास आलेले आहे. तसेच सदर इमारतीचे छप्पर हे बांधकामाच्या खूप बाहेर असल्याने त्यावरून येणारे पाणी रस्त्यावर जात आहे. तरी सदर अनधिकृत बांधकामावर आपण लक्ष देऊन योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी पोयेकर आणि विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, युवासेना उपसंघटक तेजस राणे आदींनी केली आहे.

नाईक यांनी खाजगी जमिनीत केलेल्या उत्खननामुळे जर रस्त्यावर चिखल झाला तर त्याकरिता संबंधित जमीन मालकाला पावती भरून नगरपंचायतचा बंब देणे योग्य होते. बिना पावतीचा बंब खाजगी कामाकरता कसा काय दिला? असा सवाल केला. तसेच नगरपंचायत सत्ताधारी आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील नाईक यांनी केला. तीन महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज करून त्याची दखल का घेतली गेली नाही? असा देखील सवाल नाईक यांनी उपस्थित केला. प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप नाईक व पारकर यांनी याप्रसंगी केलाय.