
वैभववाडी : कुसूर गावात राबविण्यात आलेल्या जलस्वराज्य प्रकल्पाची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवक घनश्याम नावळे यांना २५हजारांची शास्ती माहिती आयुक्तांनी बजावली आहे. कुसुर ग्रामपंचायत प्रकरणी माहिती आयुक्तांची ही दंडात्मक तिसरी कारवाई आहे.
कुसुर गावात पाणीपुरवठा करण्यासाठी सन २००४ते २००९या कालावधीत १ कोटी २ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या प्रकल्पाची सविस्तर माहिती अँड संदीप सुर्वे यांनी माहीतीच्या अधिकारात जिल्हा परिषद, पंचायत समिती व कुसूर ग्रामपंचायत यांच्याकडे केली होती. यापैकी जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून श्री सुर्वे यांना माहिती उपलब्ध झाली.मात्र कुसूर ग्रामपंचायतीकडून माहिती उपलब्ध झाली नाही. यानंतर त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यांनी याबाबत माहिती आयुक्तांकडे अपील केले. याची सुनावणी जुलै २०२४मध्ये झाली. यावेळी ग्रामसेवक यांनी ही माहिती चोरीला गेली असल्याचे सांगितले.
दरम्यान राज्य माहिती आयुक्तांनी गटविकास अधिकारी यांना संबंधित दस्तऐवज हरविल्याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर याबाबत ऑक्टोबर २०२४मध्ये पुन्हा सुनावणी झाली.यावेळी ग्रामसेवक यांनी माहिती ग्रामपंचायतीत उपलब्ध झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर याप्रकरणी ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावित आपल्याला प्रतिदिन २५० रूपये प्रमाणे २५ हजार रूपयांची शास्ती का लादण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. ग्रामसेवक श्री.नावळे यांनी याबाबत खुलासा केला परंतु तो माहीती आयुक्तांनी अमान्य केला. माहीती लपविणे आणि टाळाटाळ केल्याप्रकरणी आयुक्तांनी ग्रामसेवकांवर २५ हजार रूपयांची शास्ती लादण्यात आली आहे. ही रक्कम त्यांच्या पाच मासीक वेतनातुन वसुल करण्याचे आदेश देखील गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या कारवाईमुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. यापुर्वी कुसुर ग्रामपंचायत प्रकरणी एका विस्तार अधिकाऱ्यावर २५ हजार रूपयांची शास्ती लादण्यात आली होती. आता पुन्हा ग्रामसेवकास शास्ती लादण्यात आली आहे.