
दोडामार्ग : रब्बी क्षेत्र वाढ मोहिम व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे निमित्ताने एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत निवड केलेल्या गाव परमे येथे लोकसहभाग व कृषी विभागाच्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.
गावाच्या मंदिरानजीकच्या ओढ्यावर बंधारा घातल्याने पाण्याचा प्रवाह थांबून पाणी जमिनीत मुरून पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर गावातील जनावरे व पशू, पक्षांना येत्या उन्हाळ्यातही पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी परमे सरपंच प्रथमेश मणेरीकर व गावातील युवक, उपस्थित होते.
सदर बंधाऱ्याची उभारणी दोडामार्ग तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, परमे कृषी सहाय्यक साईराम शिंदे, दोडामार्ग कृषी पर्यवेक्षक अजित कोळी, यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांना तृण धान्याचे आहारातील महत्त्व, बदलती खाद्य पद्धती त्यामुळे मानवी आरोग्यावर होणारे त्याचे अप्रत्यक्ष परिणाम व यासाठी स्थानिक उपलब्ध होणारी तृणधान्ये नाचणी, वरई, बाजरी, ज्वारी यांसारख्या तृणधान्याचा आहारात समावेष केला पाहिजे. ग्लूटेनयुक्त गहू, मैदा आधारित खाद्य पद्धतीमुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या व्याधी व विकार निर्माण होतात. यामुळे तरुणांनी तृणधान्य आधारित कुटुंबात खाद्य पदार्थांची मागणी केली पाहिजे. मकरसंकरांतीसाठी व भोगी सणाला भोगीची सर्व प्रकारच्या भाज्या पासून बनवलेली भाजी व नाचणीची भाकरी खाऊन आपण या तृणधान्य वर्ष २०२३ चे स्वागत व स्वीकार करूया, असे मनोगत याप्रसंगी दोडामार्गचे तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी व्यक्त केले.