
देवगड : 'एक पणती मावळ्यांसाठी, एक दिवस सैनिकांसाठी' या विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित उपक्रमांतर्गत किल्ले विजयदुर्ग येथे १ जानेवारी रोजी ५० मशाली व ५ हजार पणत्या प्रज्वलित करून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर होणाऱ्या या भव्यदिव्य दीपोत्सवाच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले व अतुल रावराणे यांची असणार आहे.
रविवार सकाळी ९ वाजता विजयदुर्ग किल्ल्याच्या ठिकाणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिवप्रतिष्ठानमित्र मंडळ, वरची पुजारी वाडी, नाडण, गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग व शिवप्रेमी मंडळ यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.बुधवारी शिवप्रेमी मंडळाचे विजयदुर्ग बंदर जेटीवर आगमन होणार आहे. दुपारी ३.३० वाजता विजयदुर्ग पंचक्रोशीतील विजयदुर्ग, रामेश्वर,गिर्ये या तिन्ही गावातील ग्रामस्थांसह सडेवाघोटण, पडेल, मोंड, वाडा, मणचे, फणसे, सौंदाळे, तिर्लोट येथील शिवप्रेमी मिळून छत्रपती शिवरायांची ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढणार आहेत.या कार्यक्रमात श्रीमंत योगी मर्दानी आखाडा शिवकालीन युद्धकला केंद्र (पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांची शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळातील प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. शुक्रवार, ३ रोजी रक्तदान शिबिर विजयदुर्ग पोलिस ठाणे सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.