
सावंतवाडी : संत गाडगेबाबा मंडईच्या पुनर्बांधणीसह स्थानिक व्यापाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या व्यवस्थेबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी नगरपरिषदचेच्या सभागृहात रात्री उशीरा बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह माजी नगरसेविका अनारोजिन लोबो, राजन पोकळे, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदींसह न.प.चे अधिकारी व मंडईतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली.
यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, संत गाडगेबाबा महाराज सावंतवाडीत आले होते. त्यांची या ठिकाणी सभा झाली होती. त्यांच्या स्मरणार्थ ही मंडई शहरात बांधण्यात आली होती. नव्यानं मंडई उभारण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु, ते खर्च झाले नव्हते. आता साडेबारा कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एकुण २५ कोटी यासाठी लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटी लागणार आहेत. एकाचवेळेला हा निधी एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्याच हस्ते याच भूमिपूजन केलं जाणार आहे. या ठिकाणच्या व्यापारी वर्गाची तात्पुरती सुविधा कोठे करायची या संदर्भातील बैठक आज पार पडली. खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली असून सहकार्याची भूमिका व्यापाऱ्यांनी दर्शविली आहे. त्यामुळे दोन ते तीन आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत याच भुमिपूजन होईल असं मत व्यक्त केले.
आठवडा बाजार हलविणार !
तर आठवडा बाजाराबाबत आज निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. होळीच्या खुंटावर या पुढच्या काळात आठवडा बाजार भरेल. जेणेकरून स्थानिक व्यापारी वर्गाला याचा त्रास होता नये व तलावाचा काठ सुंदर बनवला आहे. पुर्वीच्या काळात या ठिकाणी स्टॉल होते. ते काढून सुंदर केलेला हा काठ आठवडा बाजारामुळे विदृप दिसायला लागतो. मोती तलाव हे सावंतवाडीच हृदय आहे. त्यामुळे तलाव विदृप होण हे मला कधीही आवडणार नाही. त्यामुळे लवकरच हा बाजार हलविण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.
...तोवर पर्यायी जागेत होणार व्यवस्था
भाजी मंडई विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्थेसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आल्यात. यात वसंत प्लाझा ते गोल्डन बेकरी ते मॅगो हॉटेल ते फिश मार्केट ते कळसुलकर हायस्कूल पर्यंत बंदीस्त केलेल्या नाल्याचा भाग तसेच शाळा नं. ३ च्या बाजूची पार्किंग जागा, स्टेट बँक व भांगले पेट्रोल पंप बाजूची पार्किंगची जागा या ठिकाणी सोय केली जाणार आहे.