दीपक केसरकर यांचा ऐतिहासिक मताधिक्याने विजय हाच अजेंडा : सचिन वालावलकर

Edited by: दिपेश परब
Published on: August 13, 2024 10:05 AM
views 304  views

वेंगुर्ला : विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसली पाहिजे यासाठी जोमाने कामाला लागा. गेली तीन टर्म आमदार राहिलेले राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवून त्यांनी येथील जनतेच्या कल्याणासाठी योजलेल्या संकल्पांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपल्याला झपाटून काम करावे लागेल. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उठणाऱ्या वावड्यांवर अजिबात लक्ष देऊ नका. दीपक केसरकर यांचा ऐतिहासिक मताधिक्याने विजय हाच आपला एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ला शिवसेनेच्या बैठकीत केले.

शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील सप्तसागर कॉम्प्लेक्समधील शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीस शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुका संघटक बाळा दळवी, शहर प्रमुख उमेश येरम, कोस्टल विभागाचे तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी शिवसेनेचे पदाधिकारी दिलीप मठकर यांच्या मातोश्री उषा प्रभाकर मठकर व पंचायत समितीचे माजी सभापती सुनील मोरजकर यांच्या मातोश्री मिराबाई मधुकर मोरजकर यांची देवाज्ञा झाल्याने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. शिवसेनेची ताकद दिसली पाहिजे यासाठी गावागावात पक्षबांधणी केली पाहिजे. महिला आघाडीची संघटना अधिक मजबूत केली पाहिजे यासाठी पदाधिकाऱ्यांनी कष्ट करावेत. विरोधकांकडून नेहमीप्रमाणे अफवा पसरविण्याचे काम केले जाईल. त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. पक्षश्रेष्टींच्या सूचनांप्रमाणे आपण आपले काम चालू ठेवले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी बोलताना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले.

येणारा काळ हा निवडणुकांचा काळ असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने आतापासूनच कामाला लागावे. तुम्ही तुमच्या कामातून तुमची क्षमता दाखवून द्या, म्हणजे आगामी स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून तुमची दावेदारी कायम होईल. स्वतःवा सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. या संधीचे सोने करा, असे मार्गदर्शन तालुका संघटक बाळा दळवी यांनी केले.