
सावंतवाडी : शहराचा सर्वांगीण विकास आणि शहराची सुंदरता, स्वच्छता व शांतता अबाधित राखण्यासाठी शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. हा विजय पूर्वीप्रमाणे २१ जागांवर मिळवून सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी मतदारांनी आशीर्वाद द्यावा, असे ते म्हणाले.सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित बुद्धिजीवी नागरिकांशी संवाद साधताना आमदार केसरकर बोलत होते.
यावेळी मंत्री उदय सामंत यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. आमदार केसरकर यांनी यावेळी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मंजूर होऊन भूमिपूजन झाले असले तरी, अटी-शर्तींमुळे त्याचे काम रखडले आहे. जमिनीबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय होऊनही विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिमखाना मैदानावर तालुका क्रीडांगण होत आहे, ज्यामुळे शहरात खेळण्यासाठी चांगले स्थान मिळेल. येथे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या नावाने ड्रेसिंग रूम तयार झाला आहे.
तर संत गाडगेबाबा मंडई येथे नवीन कॉम्प्लेक्स तयार होत आहे, ज्यात १०० वाहने पार्किंग होऊ शकतील अशी अंडरग्राउंड पार्किंगची सोय ठेवण्यात आली आहे. हेल्थफार्मचे खासगीकरण झाले असून ते लवकरच सुरू होईल. मोती तलावात संगीत कारंजा बसवण्यात आला आहे. तो पाच वर्षांसाठी कंत्राटदार चालवणार असून, त्यानंतर पालिकेकडे हस्तांतरित होईल. यातून लोकांचे मनोरंजन होईल. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचे काम सुरू आहे. शिरशिंगे, घारपी, माजगाव धरण योजना मंजूर असून, माजगाव योजनचे काम सुरू झाले आहे, असे त्यांनी सांगितले.संकेश्वर-बांदा रस्ता सावंतवाडी शहरातून जाईल, तसेच शक्तिपीठ महामार्गावर मळगावला जोडताना सावंतवाडीमध्ये एक्झिट पॉइंट ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन योजना राबविण्यात येत आहेत. कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचवण्यासाठी कंटेनरची सोय करण्याचा प्रयत्न केला जाईल.
केसरकर म्हणाले की, मोती तलावाच्या सौंदर्य विकासासाठी निधी परत गेला असला तरी, आपले निश्चित प्रयत्न आहेत. सावंतवाडी हे पर्यटन शहर म्हणून विकसित करताना येथे विशेषतः पर्यटकांना आकर्षित करेल असा विकास केला जाईल. जिमखाना इमारतीचे बांधकाम सुरू असून, क्रीडांगणामुळे सर्व खेळांची येथे रेलचेल असेल. बांदा येथेही क्रीडांगण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. "नगरसेवक चुकले तर कान धरण्याची ताकद मी ज्येष्ठ असल्याने माझ्यात आहे. शहराच्या नागरिकांसाठी नागरी सुविधा देण्यासाठी मी सतत प्रयत्न केले आहेत. नरेंद्र डोंगर आणि मोती तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न राहिले आहेत," असे सांगून त्यांनी मतदारांना शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येक प्रभागात फिरून आवाहन करण्याची विनंती केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी शहरातील अंडरग्राऊंड वीज योजना ज्यांच्यामुळे परत गेली, तो निधी पुन्हा उपलब्ध व्हावा म्हणून आपण आंदोलन केल्याचे सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यासाठी शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांनी मनोगत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, मी जनतेला वेळ देईन. मला भेटायला वेळ घ्यावा लागणार नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी सुविधा देण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन. यावेळी शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,अशोक दळवी, प्रेमानंद देसाई,बबन राणे, अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, भारती मोरे, गोविंद वाडकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, सुरेंद्र बांदेकर, बंड्या कोरगावकर, ॲड. सायली दुभाषी, पूजा आरवारी, उत्कर्षा सासोलकर, वैभव म्हापसेकर, वेदिका सावंत, प्रसाद नाईक, बासित पडवेकर, हर्षा जाधव, स्नेहा नाईक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











