साहित्य पर्यटनाची संकल्पना चांगली, शंभर टक्के अंमलबजावणी : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: November 05, 2024 15:14 PM
views 185  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील प्रतिभावंत साहित्यिक वि.स.खांडेकर, जयवंत दळवी, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, डॉ.वसंत सावंत या नामवंत साहित्यिकांच्या घरांना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या१९८२ च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली होती. साहित्य पर्यटनाचा हा अनोखा अनुभव त्यांनी घेतला होता. या साहित्य पर्यटनाची व डॉ. वसंत सावंत यांच्या स्मारकाची मागणी करण्यात आली होती. याबाबत मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच लक्ष वेधलं असता 

साहित्य वारीची ही संकल्पना चांगली आहे. येणार सरकार हे शंभर टक्के आमचंच असेल. त्यामुळे साहित्य पर्यटनाची अंमलबजावणी केली जाईल अस मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स. खांडेकर यांच स्मारक त्यांच्या सावंतवाडीतील घरी व्हाव‌ यासाठी मी प्रयत्नशील होतो. मात्र, येथील भाडेकरूनी सहकार्य केलं नाही. अन्यथा ते स्मारक त्यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी झालं असतं. कवीवर्य डॉ. वसंत सावंत हे माझे शिक्षक होते‌. त्यांच्या कविता केशवसुत कट्टा येथे आहेत. या मार्गाला त्यांचे नाव देण्यात आलेलं आहे‌. नगराध्यक्ष असताना या गोष्टी मी केल्या होत्या. कवीवर्य केशवसुतांच स्मारक करताना त्यांच्या प्रसिद्ध कवितेची आठवण करून देणारी तुतारी तिथे बसवली आहे. कल्पकतेन हे स्मारक आम्ही साकारल आहे. या ठिकाणी येणाऱ्या लोकांना संगमरवरी दगडावर कोरलेल्या केशवसुत व डॉ. वसंत सावंत यांच्या कविता वाचता येतात. कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच गाव उभादांडा हे कवितांच गाव म्हणून आम्ही घोषीत केले आहे‌. येथील कविता जगभरातील पर्यटकांना समजाव्या यासाठी भाषांतरीत देखील केल्या आहेत. आरती प्रभू, जयवंत दळवींचही साहित्य क्षेत्रातील कार्य येणाऱ्या पिढीला कळाव हा मानस आहे‌. साहित्यिकांच्या पाऊलखुणा शोधणारी साहित्य पर्यटनाची वारी ही संकल्पना चांगली आहे. आम्ही सत्तेत शंभर टक्के येणार आहोत‌. सरकार आमचं असणार आहे‌. त्यामुळे आल्यावर पहिल्यांदा याची अंमलबजावणी करू असं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.