सावंतवाडी : सावंतवाडी मिनी महोत्सवाला माजी मंत्री दीपक केसरकर व आमदार निलेश राणे एकाच मंचावर आले. शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. महोत्सवाचा शुभारंभ करून दोन्ही नेते एकत्र रवाना झाले.
सावंतवाडी मीनी पर्यटन महोत्सवाला शिवसेना नेते माजी मंत्री दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांनी उपस्थितीती लावली होती. दोघांनाही मुंबईला रवाना व्हायचे होते. योगायोग म्हणजे दोघेही एकाच विमानाने मुंबईला जाणार होते. व्यासपीठावर भाषणावेळी दोघांच्या हे लक्षात आलं. यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, दीपक केसरकर यांनी मतदारसंघात अनेक गोष्टी सुरू केल्या. सर्वात जास्त तास बैठक घेण्याचा रेकॉर्ड दीपक केसरकर यांचा आहे. या मतदारसंघात सर्वाधिक निधी आणण्याच काम त्यांनी केलं. यासाठी कौशल्य लागतं. आपल्या जिल्ह्यासाठी निधी आणणनं सोप्पं नाही. गावागावातील ट्रान्स्फार्मर हे केसरकर यांच्यामुळे लागलेत. माझ्यासाठी व्हॅनमधून प्रचार करणारे दीपक केसरकर असून त्यांच्यामुळे मी खासदार झालो. मी केसरकर यांच्यासोबत आहे. जेव्हा हाक माराल तेव्हा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध असेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच माजी मंत्री दीपक केसरकर म्हणाले, पर्यटनदृष्ट्या सक्षम प्रत्येक गावात महोत्सव होतील. सिंधुरत्न योजनेतून त्यांना निधी दिला जाईल. तसेच इयर एंड ऐवजी कोकणातील स्पेशल सिझनला आगळा वेगळा महोत्सव भरवून पर्यटकांना इथे येण्यास भाग पाडू असं त्यांनी सांगितलं. महोत्सवामागे केवळ मनोरंजन नाही तर रोजगार निर्मितीचाही हेतू होता. जगभरातील महोत्सवासारखे महोत्सव नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात करू असे दीपक केसरकर यांनी सांगितले. जिल्ह्याचा चेहरा मोहरा पालटण्याची ताकद आमच्यात आहे. येणाऱ्या काळात ते दिसून येईल. संजू परब यांना निलेश राणे हे एकमेव व्यक्ती आहे जे थांबवू शकले. अन्यथा या आधीच संजू परब सोबत असते अस सांगत व्यासपीठावर हशा पिकवला व नवीन वर्ष सुखाचे व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, महोत्सवाचा शुभारंभ करून निघताना केसरकरांनी निलेश राणेंना आपल्या गाडीत बसण्याची विनंती केली. यानंतर दोघेही एकाच गाडीतून गोवा येथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिनेश रावाना झाले. त्यानंतर एकत्र विमान प्रवास करत त्यांनी मुंबई गाठली. कार्यक्रमात भाषणावेळी दोघांनीही येणाऱ्या खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे तिन्ही आमदार मिळून सिंधुदुर्गचा कायापालट करू असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे एक गाडी, एक विमान अशी सफर करणारे राणे अन् केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच विमान देखील वेगानं उडवतील अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे