तिलारीतील महालक्ष्मीचा वीज पुरवठा पूर्वरत करण्यासाठी दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वेधलं लक्ष

प्रश्न दोडामार्ग वासियांना नियमित विजेचा
Edited by: संदीप देसाई
Published on: June 20, 2023 21:23 PM
views 81  views

दोडामार्ग:

तिलारी येथील महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्रातून होणारा विदयुत पुरवठा पुन्हा सुरळीत सुरु करणेबाबत अखेर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच लक्ष वेधल आहे. 

मंत्री केसरकर यांनी यासाठी खास फडणवीस यांना पत्र लिहिलं असून त्यात म्हटलं आहे की, माझ्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग तालुक्याला विदयुत पुरवठा करत असलेला तिलारी येथील महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्रातील वीज पुरवठा बंद केला आहे. महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्रातून सासोली येथील वीज वितरण केंद्राला वीज पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्रातून दोडामार्ग तालुक्याला होणारा वीजपुरवठा बंद आहे. त्यामूळे इन्सुली येथून वीज पुरवठा केला जात आहे. परंतु इन्सुली येथील वीजपुरवठ्यात काही बिघाड झाल्यास वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. प्रत्येक गावाच्या नळपाणी योजनेवर परिणाम होत आहे. नागरिकांना वेळेत व मुबलक पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. अशा प्रकारे अनेक विविध समस्या उद्भवतात, व्यापारी, शासकीय कार्यालये, दवाखाने, व सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

  तरी महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्रातून होणारा विद्युत पुरवठा सुरु करण्याकरिता प्रलंबित कार्यवाही पूर्ण करून सदरचा तिलारी येथील महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्रातून होणारा विद्युत पुरवठा पूर्वरत सुरु करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना करण्यात याव्यात. अशी विनंती मंत्री केसरकर यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.