दीपक केसरकर धावले मच्छिमार व्यवसायिकांच्या मदतीला

१ लाखांची तातडीची मदत
Edited by: दिपेश परब
Published on: November 15, 2023 13:46 PM
views 429  views

वेंगुर्ले :  शिरोडा केरवाडी येथे चौगुलेश्वर वाडी येथील प्रवीण उर्फ गोट्या परब यांच्या मासेमारीचे साहित्य ठेवण्याच्या जागेला भीषण आग लागून यात सर्व साहित्य जाळून प्रवीण परब यांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले होते. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी (१४ नोव्हेंबर) रोजी नुकसान झालेल्या जागेची पाहणी करत प्रवीण परब यांना तातडीची १ लाख रुपयांची मदत देत १ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. 

  ही आगीची घटना १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या दरम्यान घडली होती. या आगीत प्रवीण परब यांच्या मासेमारीचे साहित्य मोठमोठी जाळी, मशीन, टॅंक, फिश फाईंडर असे सर्व जळून खाक झाले होते. प्रवीण परब यांचा संपूर्ण उदरनिर्वाह या व्यवसायावर असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. याची तात्काळ दखल घेत त्यांच्या मदतीसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सरसावले आहेत. तसेच सिंधू रत्न मधून मच्छिमारी बोट तसेच इतर साहित्य देण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, मच्छिमार सोसायटी चेअरमन काशिनाथ नार्वेकर, शिरोडा माजी उपसरपंच रवी पडणेकर, माजी सदस्य कौशिक परब यांच्यासाहित प्रशासकीय अधिकारी, मच्छिमार सोसायटी सदस्य, पोलीस पाटील, केरवाडी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.