
वैभववाडी : बिहार येथील कामगाराच्या शुकनदीपात्रात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ वाढले आहे. प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यू मानले गेलेले प्रकरण आता संशयास्पद वळणावर आले आहे. त्या मृत कामगाराला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
राकेश केतन मांझी (वय २८, रा. गोपालगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव असून तो नापणे येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर काम करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो येथे कार्यरत होता. २७ मार्च रोजी वैभववाडी शहरातील आठवडी बाजारासाठी गेलेला मांझी रात्री उशिरापर्यंत परतला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपासून सहकारी कामगारांनी त्याचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, शुक्रवारी(२९मार्च) सकाळी सोनाळी गावातील शुक नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.त्यानंतर सहकारी कामगारांनी मृतदेहाची ओळख राकेश मांझी अशी पटवून दिली.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. सुरुवातीला पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र, यानंतर मांझी याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक तरुण त्या कामगाराला बेदम मारहाण करीत आहे.त्याला जमीनीवर पाडून त्याच्या मानेववर पाय दिल्याच स्पष्ट दिसत आहे.यामध्ये आणखी काही जण असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे हा मृत्यू अपघाती नसून मारहाणीमुळे झाला असावा, असा संशय निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांनी प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला असून संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी सोनाळी येथील काहींना चौकशीसाठी आणले होते.दोन दिवस त्यांची चौकशी सुरू आहे.










