दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील ख्रिश्चनवाडी परिसरात दुर्दैवी अपघात
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 02, 2025 18:19 PM
views 141  views

सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस ख्रिश्चनवाडी येथे रविवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात स्थानिक रहिवासी शंकर विश्राम भोगले (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, कणकवली येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेला आणि मूळचा बिहार राज्यातील अंकुर कुमार झा (वय २८) हा युवक बजाज प्लॅटिनम (एम.एच.०७ ए.क्यू.८८५६) या दुचाकीवरून कणकवलीहून कुडाळकडे जात होता. ओरोस ख्रिश्चनवाडीतील चर्चजवळ तो पोहोचल्यावर सकाळी अंदाजे दहा वाजण्याच्या सुमारास पादचारी शंकर भोगले रस्ता ओलांडत असताना दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत गंभीर जखमी झालेल्या भोगले यांना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात भोगले यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेबाबत ओरोस ख्रिश्चनवाडी येथील शरद तातोबा परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी दुचाकीस्वार अंकुर झा याच्यावर बेदरकार वाहनचालना केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून झा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ)(ब), २६१ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.