
दोडामार्ग : साटेली गावचे माजी सरपंच रमेश परिट यांचा मुलगा प्रसाद परिट ( वय ३०) या उमद्या युवकाचे बुधवार रात्री मडगांव गोवा येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रसादच्या निधनाची बातमी रात्री गावात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर बातमी अशी कि प्रसाद हा गोव्यात मडगांव येथील एका बँकेत कामाला होता. आई- वडलांचे यापूर्वी निधन झाले. तर साटेली येथे प्रसाद व त्याचा लहान भाऊ असे दोघेच राहत होते. प्रसादची बहीण काही वर्षांपूर्वी लग्न करून दिली. आई-वडिलांची साथ नसतानाही अपार कष्ट आणि मेहनत यांच्या जोरावर त्याने लहान भावाचे शिक्षण त्याच बरोबर काही महिन्यांपूर्वी गावात नवीन घर बांधले.
सर्वांशी मनमिळावू स्वभाव असल्यामुळे गावात त्याचा मित्र परिवार मोठा होता. गावातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा तो सक्रिय कार्यकर्ता होता. यावर्षीच्या कार्यक्रमाच्या देखाव्याची जबाबदारीही त्याने उचलून ती पूर्ण केली होती. बुधवार रात्री नवरात्रीच्या ठिकाणी कार्यक्रम चालू असतानाच प्रसादच्या दुःखद निधनाची बातमी समजताच त्याचा मित्र परिवार रात्रीच मडगावला रवाना झाला. प्रसादच्या अकाली एक्झिटमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. त्याच्या पच्छात लहान भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे.










