आयटीआय प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत मुदतवाढ

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 07, 2025 15:42 PM
views 58  views

मुंबई  : व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ६ जूनपासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू केली आहे. मात्र, मुंबई शहरातील हेल्पलाइन क्रमांक शुक्रवारी काही काळ बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.

चॅटबॉटद्वारे मदत करण्याबरोबरच व्यवसाय  शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाने प्रत्येक विभागात मदत संपर्क क्रमांक दिले आहेत. मात्र, मुंबईतील संपर्क क्रमांकावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाठक  यांनी संपर्क केला असता तो बंद असल्याचे सांगितले. तसेच प्रस्तुत प्रतिनिधीनेही त्या क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले. अशावेळी चॅटबॉटचा उपयोग होऊ शकतो.

राज्यात आयटीआयसाठी एकूण विद्यार्थी नोंदणी १,३९,०३२ एवढी झाली आहे तर १,२७,४५७ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. १,२५,००५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केला आहे. ७८,४०६ इतके प्रवेश निश्चित झाले आहेत. पर्यायी अर्ज भरलेले विद्यार्थी ६८,५८३ इतके आहेत, अशी माहिती व्यवसाय  शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.