
देवगड : देवगड तालुक्यातील वाडा गुरववाडी 'बन' येथील ओहोळात मृतदेह आढळून आला असून वाडा गुरववाडी येथील हरिश्चंद्र गंगाराम गुरव (वय ४०) याचा तो मृतदेह आल्याची खात्री पटली आहे. वाडा गुरववाडी येथील हरिश्चंद्र गंगाराम गुरव (वय ४०) याचा तो मृतदेह वाडा 'बन' येथील ओहोळात बुधवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास आढळून आला.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हरिश्चंद्र गुरव हे गावात मोलमजुरीची कामे करायचे. त्याची बहीण विवाहित असून तो सध्या आपल्या आईसोबत राहत होता. त्याला दारुचे व्यसन होते.बुधवारी सकाळी नियमितपणे कामाला जातो,असे सांगून घरातून निघून गेला.दुपारच्या सुमारास वाडा 'बन' या भागातील ओहोळात चढणीच्या मासेमारी करण्यास गेलेल्या संतोष सहदेव घाडी (५२, रा. वाडा घाडीवाडी) याला ओहोळामध्ये पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी वाडा पोलीस पाटील महेंद्र मांजरेकर यांना घटनेची माहिती दिली. श्री. मांजरेकर यांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता तो मृतदेह हरिश्चंद्र गुरव याचा असल्याचे स्पष्ट झाले.
देवगड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेची फिर्याद संतोष घाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. पोलीस हवालदार आशिष कदम हे या घटनेचा तपास करीत आहेत.या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.