क्रशर खाणींमध्ये रात्रंदिवस विनापरवाना उत्खनन | कारवाईची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 18, 2024 11:41 AM
views 122  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात दगड खाणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यामध्ये सोनुर्ली, वेत्ये, इन्सुली, विलवडे, वाफोली आदी भागांमध्ये क्रशर, क्वारी रात्रंदिवस चालू असतात. शासन नियमानुसार सूर्योदयापासून सूर्यास्त होईपर्यंत दगड खाणी चालू असावेत. परंतु या खाणी रात्रंदिवस सुरू असतात. खाणीमध्ये बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. दिवसाढवळ्या सोनुर्ली, वेत्ये येथील दगडखाणी वरून निगुडे मार्गे सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत गोवा राज्यात विनापास ५० ते ६० डंपर दररोज वाहतूक केली जाते. त्यामुळे तात्काळ यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी तहसीलदार यांच्याकडे केली.

दरम्यान, यावर नायब तहसीलदार मनोज मुसळे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक नेमून संबंधित यंत्रणेची मोजमाप घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे आश्वासन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.येथील सावंतवाडी तालुकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना  मिलिंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन देण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार पोलीस पंचनामा अनाधिकृत वाहतूक होत असताना करणे गरजेचे आहे. परंतु आपण परस्पर वाहने कारवाई करून सोडतात. त्याचप्रमाणे विलवडे वाफोली गावात मोठ्या प्रमाणात अशाच दगड खाणी मधून बोअर ब्लास्टिंग होते. त्याचा धोका वाफोली धरणाला होऊ शकतो. भविष्यात धरणाला काही धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. या अशा अनेक गावातून या दगडखणी क्रशर, चिरेखाणी विरोधात तक्रारी आपल्याकडे आले असताना कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे तात्काळ यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील यावेळी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विजय बांदेकर, श्रीराम सावंत, राजन परब आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.