'महाराष्ट्र कन्या' संसदरत्न सुप्रियाताई !

Edited by: विनायाक गावस
Published on: June 29, 2023 19:49 PM
views 81  views


वाढदिवस विशेष

अर्चना घारे - परब 

लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या सौ. सुप्रियाताई सुळे ! केवळ साहेबांची कन्या एवढीच ताईंची ओळख नाही आहे. जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी लढणारी आमची ताई एक बुलंद कहाणी आहे. घरात राजकारणाचा वारसा असताना देखील सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपलं वेगळे स्थान त्यांनी निर्माण केलं आहे. निवडणुकांपूर्वी राजकारण आणि नंतर कायम समाजकारण ही त्यांच्या कामाची एक वेगळी खासियत आहे. पवार कुटुंबियांचे राजकीय वलय असताना सुद्धा अत्यंत साधे राहणीमान ठेवत तळागाळातील प्रत्येक व्यक्तींचे प्रश्न सोडविण्याचा ताई प्रयत्न करतात.


आजपर्यंत सुप्रियाताईंनी कोणतंही मंत्रिपद भूषवलेलं नाही. मात्र, पक्षातील युवती संघटना असो किव्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सारख्या संस्था असोत, त्या यशस्वीरीत्या चालवण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. नुकतीच त्यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी देखील त्या समर्थपणे निभावतील. आपण ज्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्या अथक परिश्रम घेत आहेत. त्याच बरोबर फक्त आपल्या मतदारसंघापुरता मर्यादित विचार न करता महाराष्ट्रातील, देशातील जनतेच्या, अनेक समाज घटकांच्या प्रश्नांबाबत त्या लोकसभेत आवाज उठवत असतात. अनेक महत्त्वाचे विषय संसदेत मांडण्याचा, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी मनापासून केला. लोकसभेतील त्यांची उपस्थिती, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची कामगिरी आणि त्याबद्दल त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, अनेक वेळा मिळालेले संसदरत्न पुरस्कार त्याचीच पोच पावती आहे. 


प्रत्येक विषयाचा बारकाईने केलेला अभ्यास, त्याचे सादरीकरण, मुद्दा मांडण्याची पद्धत, वेळ न घालवता झटपट निर्णय घेण्याची क्षमता, त्यांच्या कामाचा झपाटा, आम्हाला अवाक करतो. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुप्रियाताई कौटुंबिक भान सुद्धा जराही विसरलेल्या नाहीत. राजकारण, समाजकारण, संघटनेचे काम,  संसदेतील काम, मतदारसंघ, महाराष्ट्रातील विविध संस्थांचा कारभार या सगळ्यात त्या आई-बाबांची काळजी घेतात. स्वतः बरोबर कुटुंबाचे आरोग्य आणि मुलांची जडणघडण यावर बारकाईन लक्ष ठेवून असतात. त्याच बरोबर मतदारसंघातील जनता आपलं कुटुंब आहे. असं त्या मानतात. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांगांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात तसेच कर्णबधिर व इतर व्यक्तींना आवश्यक साधनसामग्री मिळावी, महिलांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्नशील राहतात. तळकोकणातील विकास व लोकहिताच्या सर्व गोष्टींत देखील कायम त्यांचं मार्गदर्शन व संपूर्ण पाठींबा असतो. 


देशाच्या पंतप्रधानापासून ते मतदारसंघातील अगदी तळातील घटकांपर्यंत प्रत्येकाशी ताईंनी व्यक्तिगत चांगले संबंध निर्माण केले आहेत. केवळ एक राजकारणी अशी प्रतिमा त्यांची नाही. आपल्याच कुटुंबातील एक सदस्य अशी स्वतःची ओळख सर्व सामन्यांच्या मनात त्यांनी निर्माण केली आहे. आणि म्हणुनच प्रत्येकाला *ताई आपली हक्काची* वाटतात. आपल्याच कुटुंबातील घटक वाटतात. 


आज महाराष्ट्राचे नाव देशाच्या सर्वोच्च सभागृहात ताई  गाजवत आहेत. एक लेक काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रियाताई आहेत.  अशा संसदरत्न खासदार महाराष्ट्र कन्या सुप्रियाताईंना त्यांच्या वाढदिनी दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना ! 

 अर्चना घारे-परब