पाडगावात 'दत्त' उत्सव !

Edited by:
Published on: December 27, 2023 11:42 AM
views 109  views

देवगड : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग कोल्हापूर राज्य मार्गावर वसलेल्या पोंभुर्ले-पाडगाव येथील सुमारे 125 वर्षाचा इतिहास असलेल्या श्री दत्त मंदिराचा दत्त जयंती उत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे. श्री आशा दत्त देवस्थान ट्रस्ट पोंभुर्ले -पाडगावचे अध्यक्ष बाळकृष्ण बाबा वैद्य यांच्या आजोबांना या ठिकाणी श्री दत्त पादुका सापडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी या ठिकाणी श्री दत्त मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत हा दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

या उत्सवात जिल्हाभरासह इतर राज्यातील दत्तभक्त उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतात. 1952 ते 2012 पर्यंत हे देवस्थान काही कारणांमुळे प्रशासनाचे ताब्यात होते. त्यामुळे ते साधेपणाने उत्सव साजरा करीत होते. 2013 पासून ट्रस्टला मान्यता मिळाल्यापासून उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. येथील श्री अंबाबाई मंदिराचा जिर्णोद्धार करून पूर्ण करण्यात आला आहे. श्री दत्त मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात असून शुद्धीकरणांमध्ये रंगरंगोटी कलशारोहण मुख्य गाभाऱ्यात टाइल्स, दरवाजे, बाहेर पेव्हर ब्लॉक, पुजारी निवास, आणि भक्तनिवास ही कामे पुढील यात्रोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. मंदिर उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे कै.अनिल भोगटे यांना कायमच मानवंदना राहील. देवस्थानचे पावित्र राखून एक चांगले पर्यटनस्थळ विकसित करणे हा मुख्य उद्देश आहे.

 येथे येणाऱ्या दत्त भक्तांना चांगल्या सेवा देण्यासाठी श्री आशादत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण बाबा वैद्य,उपाध्यक्ष दत्तात्रय भोगटे, सचिव विवेक करंदीकर,खजिनदार अशोक मांडवकर, विश्वस्त अविनाश माण गावकर, सदाशिव बावकर व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. मंगळवारी पहाटे पाच वाजता विधिवत पूजा करून अभिषेक झाल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. यानंतर सायंकाळी चार  वाजता देवगडचे प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर गोगटे यांचे कीर्तन सा.६ वा.सहा वाजता दत्त जन्मोत्सव सात नंतर स्थानिक भजने तसेच रात्री बारा वाजता दत्त पालखी प्रदक्षिणा होत सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. देवगड तालुक्याच्या उत्तर दिशेला वसलेल्या पोंभूर्ले - पाटगाव या गावी श्री दत्तात्रयांचे जागृत स्थानी असणारा जत्रोत्सव म्हणजे समस्त दत्त भक्तांसाठी एक पर्वणी असते. मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला. याच दिवशी दत्तजन्मोत्सव होत असताना याचे एक रूप पोभूर्ले -  पाडगावच्या जयंती दिवशी पाहायला मिळते. गेली 125 पेक्षा अधिक वर्षाच्या इतिहास असलेल्या दत्त जयंती उत्सवात नित्यनियमाने मोठ्या संख्येने भाविक गर्दी करता. या दत्तात्रयांच्या  दर्शनासाठी दत्तभक्तांची वर्षभर गर्दी असते.