
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ सायकल स्पर्धा ११ व १२ मे २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये राज्यातील वय ७ ते ७८ वयोगटातील ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. दापोली आसूद सालदुरे पाळंदे आंजर्ले अडखळ पाजपंढरी हर्णै दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ५० किमी मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, कोकणी खाद्यपदार्थ, मासे, आंबे, फणस, काजू कोकणी रानमेवा इत्यादींचा आस्वाद घेतला.
ही सायक्लोथॉन स्पर्धा ५० किमी कोस्टल सिनिक रुट, १५० किमी शॉर्ट सिटी लूप, फॅन राईड अशा अनेक गटात झाली. सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये ७० वा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड करत साजरा करणाऱ्या पुणे येथील ७८ वर्षीय डॉ निरुपमा भावे सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ७२ व्या वर्षी पुणे ते जम्मू, ७५ व्या वर्षी पुणे ते कोलकाता, पंढरपूर ते घुमान पंजाब असे देशभर अनेक सायकल प्रवास केले आहेत. आदी कैलास, ओम पर्वत मार्गावर सायकलिंग, नुकतीच श्रीनगर ते मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग करत जागतिक विक्रम प्रस्तापित करणारे सतीश जाधव (वय ६८), अनेक लांब अंतराच्या मॅरेथॉन, राईड करत असणारे ७७ वर्षीय जुगल राठी, जगातील सर्वात उंच उमलिंगला पास सायकल चालवत सर करणारे डॉ सुभाष कोकणे (वय ७३), जयश्री जाधव(वय ६२), राजू औटी (वय ६१), विजय हिंगे (वय ६५), हेमलता राव (वय ६६) असे सायकलिंग क्रीडाप्रकारात वय हद्दपार करणारे काही रायडर्स आणि प्रेरणादायी युट्युबर माधुरी पाचपांडे इत्यादी सहभागी झाले होते. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पुणेहून डॉ सुभाष कोकणे (वय ७३), विजय हिंगे (वय ६५), विद्याधर पालकर, मुंबई ठाणेहून अक्षय खांडेकर, नारायण पेरुमल, नयन पांचाळ, तौसिफ़ शेख, रवी यादव, महेंद्र निकम, विठोबा चव्हाण हे सायकल चालवत दापोलीत आले होते.
शॉर्ट सिटी लूप मार्गावर अथर्व शेंडे, संतोष परब, स्वराज मांजरे यांनी १५०+ किमी, अनुज शिगवण, अथर्व मांडवकर, प्रेम भुसारे, सार्थक शिगवण यांनी १२५+ किमी, परेश बुटाला, स्वराज राजपूरकर, आयुष शिंदे, मयूर देसाई, इत्यादींनी ८०+ किमी सायकल चालवली. सायक्लोथॉनसाठी दापोली शिक्षण संस्था, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलीस टीम, मेनेकी अब्सुलूट एनर्जी ड्रिंक, राहुल मंडलिक, हॉटेल ओम साई इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे, सुनील रिसबूड, विनय गोलांबडे, नितीन बर्वे इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली.