
वैभववाडी : वैभववाडी - उंबर्डे मार्गावरील धोकादायक झाडांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. गेले चार ते पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीत काही झाडे उन्मळून पडली होती.सुदैवाने हानी टळली. मोठा अपघात होण्यापूर्वी ही धोकादायक झाडे तोडण्यात यावीत या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्री कवळेकर यांना वैभववाडीतील ग्रामस्थांनी दिले आहे.
वैभववाडी - उंबर्डे मार्गावर अनेक झाडे जीर्ण झाली आहेत.काही झाडे रस्त्यावर कोसळण्याच्या स्थितीत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या गटारे खुदाईत ही झाडे अधिक कमकुवत झाली आहेत.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग वैभववाडी यांना कळविले आहे. परंतु संबंधित विभाग याकडे डोळे झाक करत आहेत. संबंधित विभागाला सुकलेली व रस्त्यावर झुकलेली झाडे तोडण्याच्या आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार, सचिन सावंत, महेश रावराणे, राजू पवार, किशोर दळवी, ओजस साळुंखे आदी उपस्थित होते.