हत्तींकडून नुकसान ; उपवनसरंक्षकांचा शेतकऱ्यांशी संवाद

Edited by: लवू परब
Published on: July 03, 2024 07:01 AM
views 215  views

दोडामार्ग : रानटी हत्ती सातत्याने नुकसान करत असतात. वरिष्ठ वनअधिकारी थेट शेती शिवारात पोहचत नव्हते मात्र उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ग्राउंड पातळीवर जात संवाद साधला. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी केर येथे चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी, हत्ती पकड मोहीम राबविणे हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे सांगत अनेक व्यथा मांडल्या. यावेळी श्री. रेड्डी यांनी वनविभागाने आपल्या ज्या व्यथा ऐकल्या त्या किती प्रमाणात समाधान करू शकलो याचा अहवाल गावात येऊन वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी दर १५ दिवसांनी देतील अशी ग्वाही देत हत्ती पकड हीच प्रमुख मागणी ग्रामस्थांची असल्याचे शासनाला कळविले आहे पुन्हा पत्रव्यवहार करू याची हमी दिली. 

  यावेळी  श्री. रेड्डी यांच्यासमवेत  सहाय्यक वनसंरक्षक श्री लाड  यांनी हत्ती बाधित केर,मोर्ले, घोटगेवाडी गावामध्ये भेट देऊन शेतीची हत्तीकडून झालेली नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी दोडामार्ग वनक्षेत्रपाल व्हि .एस.मंडल , सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर , वनपाल कोनाळ किशोर जंगले,फिरते पथक स्टाफ, दोडामार्ग स्टाफ आणि सावंतवाडी स्टाफ उपस्थित होते. यावेळी हत्ती पकड या प्रमुख  मोहिमेसह शेतकरी विमा, पंचनामा क्लिष्ट बाबी, नुकसानभरपाई वाढीव, सामाविष्ठ नसलेली पिके, शेतकरी शेतीत जात नसल्याने होणारे नुकसान, प्रति कुटुंब अनुदान, सोलर - स्ट्रीट लाईट, लघु उद्योग निर्मिती, फळबाग लागवड अनुदान यांसह अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

वनविभागाने सातत्य ठेवावे

     उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी थेट शेती नुकसानीपर्यंत पोहचण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र यात सातत्य ठेऊन जेव्हा वनविभाग शेतकऱ्यांच्या मागण्याचा पाठपुरावा करून दिलासा देईल त्याचवेळी खरे समाधान होणार आहे.

हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रात नेण्यासाठी मोहीम

    सध्या हत्ती गावठण क्षेत्रात आहेत. त्यामुळे असणारी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली श्री. रेड्डी यांनी हे अंतरही पाहिले. ग्रामस्थांनी हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रापर्यंत न्या अशी मागणी केली त्याला अधिकाऱ्यानी प्रतिसाद दिला. मात्र पावसाळी हंगामातील अडचणीवर चर्चेअंति पाऊस कमी झाल्यावर याबाबतीत निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.