२१ जूनला मुंबईत डाक अदालत | ७ पर्यत तक्रारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

Edited by:
Published on: May 24, 2024 11:08 AM
views 122  views

रत्नागिरी : पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाषणामध्ये / पत्रव्यवहारमध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे दिनांक 21 जून  रोजी दु. 3 वाजता, पाचवा मजला, जी. पी. ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 127 वी डाक अदालत आयोजित केली आहे. अशी माहिती मुंबई मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांनी दिली.

या डाक अदालतीमध्ये पोस्टाचे महत्त्वाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू / मनीऑर्डर / बचत बँक खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी माहिती असावी.

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ज. शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतिसह दिनांक 7 जून पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. असे ही कळविले आहे.