सावंतवाडीत महावितरणचे तिनतेरा !

दररोजचा तांत्रिक बिघाड ठरलेला ; अधिकारी हतबल ; कर्मचाऱ्यांना सलाम !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 28, 2025 12:30 PM
views 194  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या उर्जा खात्याचे सावंतवाडी शहरासह तालुक्यात तिनतेरा वाजले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर अंधारातील गाव उजेडात आलीत. मात्र, दररोजचा होणारा तांत्रिक बिघाड ग्राहकांना मनस्ताप सहन करयला लावत आहे. दिवसाला मिनिटा मिनिटांनी ४-४ वेळा विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. 

मागील दहा दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. मात्र, त्या पूर्वीपासून सावंतवाडी तालुका व शहरात महावितरणच्या सेवेत तांत्रिक बिघाड होत आहे. पाऊस पडल्यापासून हे प्रमाण तर अधिक वाढले आहे. गेल्या १० दिवसांत एक दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला नाही असा एकही दिवस गेला नसेल. मिनिटा मिनिटांनी लाईट जाण्याचे प्रकार इथे घडत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी खडसावल्यानंतर अंधारातील गाव उजेडात आणली गेली. मात्र, तांत्रिक बिघाड नावाचं अवघड जागेच दुखणं तसंच राहिलं. महावितरण कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंतांसह जबाबदार महावितरण अधिकाऱ्यांच दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. 

पावसापूर्वी घेण्याची दक्षता यावेळी घेतली गेली नाही. त्यात जुन्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कर्माची फळं नवीन अधिकाऱ्यांना सोसावी लागत आहेत. ११ केव्ही लाईनवरील झाडाच्या फांद्या ४-४ वर्ष न हटवल्याने आता समस्येत वाढ झाली आहे. फांद्यांची झालेली वाढ बघता त्या हटवण महावितरणच्या हाताबाहेरच काम होऊन बसले आहे. त्यात यंत्रसामुग्रीची न ठेवलेली निगाही कारणीभूत आहे. २ वर्ष वापरायच्या गोष्टी १०-१० वर्ष वापरल्या गेल्यात. त्यामुळे वीज ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.महावितरणचे उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, तांत्रिक बिघाड सतत होत आहेत. लाईनवर फॉल्ट होत आहेत.‌ घराशेजारील लाईनवर झाडांच्या फांद्या गेल्यात.‌ त्याबाबत नगरपरिषदेला कळविण्यात आले आहेत. अखंडित सेवा देण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. तर जून महिना अद्याप सुरू झालेला नाही. कोकणातील पाऊस नव्या अधिकाऱ्यांना ठाऊक नाही. आजच्या पावसात उडालेली धुळधाण बघता पुढचे तीन महिने ग्राहकांच्या नशीबी काय वाढून ठेवलंय याची कल्पना करता येत नाही आहे. महावितरण कक्षाचे टोल फ्री क्रमांक तर निव्वळ एक टाईमपास ठरत आहेत. त्यामुळे आपत्कालीन कक्षाकडे फोन वळत असून तो व्यस्त लागत आहे‌. यात वीज ग्राहक संघटनेच्यावतीने महत्वपूर्ण भूमिका बजावली जात आहे.

सतत समस्यांवर आवाज उठवला जात असून वीज वितरणच काम हलकं करत ग्राहकांशी संवाद साधला जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा रोषाची धार काहीशी कमी झाली आहे. 

एकंदरीत, ही परिस्थिती निर्माण होण्यामागे मागील अनेक वर्षांपासून न दिलेल लक्ष कारणीभूत ठरत आहे. याचा नाहक त्रास सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागत आहे. या कठिण परिस्थितीतही जीवाची बाजी लावून महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहे. ऊन, पाऊस, वादळ, वाऱ्याची तमा न बाळगता येणाऱ्या संकटात रात्री-अपरात्री सेवा देत विद्युत पुरवठा सुरळीत करत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकही या कर्मचाऱ्यांना सलाम करत आहेत.