
सावंतवाडी : गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात थरारक थर लावत सावंतवाडीतील गोविंदांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून मुरलीधर मंदिरासमोरील मानाची दहिहंडी फोडत शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यात आल्या. एकूण २१ दहिहंड्या फोडण्याचा मान या गोविंदा पथकाला आहे.
गोविंदांचा हा थरार याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी व दहीहंडीचा हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सालईवाडा येथील श्री पडते यांच्या निवासस्थानी विराजमान श्री कृष्ण घेऊन प्रारंभी संस्थानकालीन मुरलीधर मंदीरात धार्मिक कार्यक्रमासह आरती करण्यात आली. यानंतर मानाची दहिहंडी फोडत श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेत असताना चौकाचौकातील तब्बल २१ दहिहंड्या फोडण्यात आल्या. यावेळी गोविंदांसह उपस्थित नागरिकांचाही उत्साह शिगेला पोहोचला होता. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच शहरात कुठेही ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी वाहतूक पोलीसही जागोजागी तैनात करण्यात आले होते. दहीहंडीचे हे थरार अनुभवण्यासा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमेय तेंडोलकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकुर, अतुल केसरकर, बाबु कुडतरकर, प्रतिक बांदेकर, सचिन केसरकर,दिनेश जाधव, सनी जाधव, मयुर लाखे, राकेश लाखे, अमित लाखे, संतोष लाखे, अंकुश लाखे, शुभम लाखे, निखिल कांबळे, फयाज मुजावर, अरूण घाडी, रोहित चव्हाण, नंदू ढकरे आदींसह अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते व सावंतवाडीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.