
सावंतवाडी : पारंपरिक साज, भक्तीचा ओलावा आणि उत्साहाचे उधाण अशा वातावरणात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांची कृष्णवेषभूषा, भावस्पर्शी भक्तिगीत, कथ्थक नृत्य आणि दहीहंडी फोडण्याच्या रोमांचकारी क्षणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
शाळेच्या प्रांगणात सकाळपासूनच “गोविंदा आला रे आला”च्या घोषणा घुमत होत्या. लहान वर्गातील सर्व विद्यार्थी कृष्णाच्या वेषात सजून आले होते. कुणी बासरी धरलेला बाळगोपाळ, तर कुणी मोरपंखी मुकुटातील मोहक राधाराणी अशा विविध रूपांमध्ये विद्यार्थी खुलून दिसत होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भगवद्गीतेतील श्लोक पठणाने झाली. त्यानंतर भक्तिगीत, कथ्थक नृत्य आणि कृष्णलीलांवर आधारित कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. सर्वात उत्कंठावर्धक क्षण ठरला दहीहंडी सोहळा. वायबीआयएसच्या बालगोविंदांनी पावसाची पर्वा न करता तीन थरांची रचना केली आणि कौशल्याने हंडी फोडली. यावेळी मैदानात “गोविंदा गोपाळा”च्या जयघोषाचा गजर झाला. पालकांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेतही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कृष्णचरित्राचे रंगीत चित्रण आणि कलात्मकता पाहून पालकांच्या कल्पकतेचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता खानोलकर यांनी केले. मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पेडणेकर, सचिन हरमलकर आणि शिक्षकांच्या टीमने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.