दाभोळ मुंबई एस.टी. बसला मध्यरात्री गंभीर अपघात

चिंचाळी धरणाजवळील दरीत बस पलटी | झाडाच्या आधाराने बस अडकल्याने धरणाच्या पाण्यात पडून होणारा अनर्थ टळला
Edited by:
Published on: January 13, 2025 16:13 PM
views 1188  views

मंडणगड : दाभोळ वरून मुंबई कडे जाणारी दापोली आगाराची एस. टी. बस बसचे चालकाचा ताबा सुटल्याने शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळ एका वळणा नजीक असलेल्या दरीत १५ फूट खोल पलटी झाली. बस दरीत एका झाडाच्या व दगडाच्या आधाराने अडल्याने खोल दरीखालील धरणाच्या पाण्यात पडून होणारी दुर्घटना आणि मोठी जीवितहानी सुदैवाने टाळली.

१२ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या या गंभीर अपघताबाबत सविस्तर वृत्त असे, की (काल ता.१२) रोजी दाभोळ येथून मुंबईकडे  दाभोळ- मुंबई,  एस.टी. बस क्रमांक MH-14-BT 2265 निघाली. वाटेत मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथील देशमुख बाग, चिंचाळी धरणा जवळ, गाडीचे चालक गाडे.व्ही.एस हे रस्त्याचे उजव्या बाजूने जात असताना चालकाचा गाडीचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्यानजीकच्या दरीत १५ फुट खोल दरीत कोसळली व दरीतील झाडे झुडपे व दगडाला अडकली. यावेळी गाडीत चालक व वाहकासह ४१ प्रवासी प्रवास करीत होते. झालेला प्रकार अतिशय गंभीर होता. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवीत हानी झालेली नसली तरी गाडीतील 30 प्रवाशी जखमी झाले. या घटनेची माहीती कळताच गावातील ग्रामस्थ सुनिल साळवी, दीपक सावंत, विकी कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गाडीतून सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी मदत केली. मदत कार्यासाठी पोहचलेल्या वाहनांमधुन दोरखंडाच्या मदतीने अपघातग्रस्त दरीतून वर आणण्यात आले. जखमी प्रवाशांना ग्रामिण रुग्णालय मंडणगड येथे प्रथमोपचाराकरिता पाठवण्यात आले. अपघातात राजेंद्र मुरकर, आफताब ढबीर, प्रणाली राऊत, सिध्देश मोरे, भरत बाकर, प्रशांत वांयगणकर, अनिता धोपट, मनिषा धोपट, दत्ताराम धोपट, प्रथमेश जाधव, भालचंद्र भेलेकर, वसुदेव घाडे, आकाश देवरुखकर, उदय चांदोरकर, रमेश भुवड, सरिता सावंत, विशाल मोरे, अक्षय जुवळे, मुस्सबर दळवी, अब्दुल परकार, राजेश साखरकर, रोहन साखरकर, रेहमान पटेल, अक्षय धोपावकर, शशिकांत जालगांवकर, सचिन गायकर, संजय चव्हाण, मंदार भोईर, रश्मी भुवड, सान्वी आसोलकर या दापोली तालुक्यातील विविध गावातील जखमी प्रवाशांवर प्रथमोपचार करण्यात आले. यात सात जणांना मोठी दुःखापत झाली असल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अन्यत्र  पाठवण्यात आले. अपघातग्रस्त बस  क्रेनेच्या मदतीने सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आली.

शेनाळे घाटातील त्या स्पॉटवर अपघातांची मालिका – गाडी दरीत कोसळलेला शेनाळे घाटातील तो स्पॉट अशाप्रकारचे अपघातासाठी प्रसिध्द झालेला आहे. काही वर्षापुर्वी क्रीकेट सामने खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांचा डंपरही याच स्पॉटवरुन दरीत कोसळला होता. त्यानंतर एक खाजगी गाडी अशा पध्दतीने खाली सरकली होती व आता एस.टी. बस, हा तिसरा अपघात आहे. शेनाळे घाटातील दरी कडील बाजूला कोणतेही सुरक्षा कठडे नाहीत. त्यामुळे वाहनांचे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्या राष्ट्रीय महामार्गाचे निर्मितीनंतर तरी या प्रश्नावर उपाय शोधला जाईल अशी अपेक्षा परिसरातील नागरीक या अपघातानंतर व्यक्त करीत आहेत.