
सावंतवाडी : नाटक संपवून घरी परतत असताना डुलकी लागल्याने झालेल्या अपघातात संतोष गुळदवेकर (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात माडखोल परिसरात रात्री १२ च्या सुमारास घडला. या घटनेत संतोषच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुळदवेकर हा नाटक कंपनीमध्ये झांज वादक म्हणून कार्यरत आहे. गोठण देवस्थान कारिवडे येथे नाटकाचा प्रयोग संपवून तो रात्री १२ च्या सुमारास मोटारसायकलने आपल्या माडखोल येथील घरी जात होता. प्रवासादरम्यान अचानक झोप आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या वाहनाला त्याने जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी निलेश राऊळ, त्यांचे सहकारी शरद पवार आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी संतोषला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची कल्पना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत जखमीवर प्राथमिक उपचार करून घेतले. अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आदे. निलेश राऊळ, शरद पवार, अमोल आरोस्कर आणि रवी जाधव यांनी या तत्परता दाखवत मदतीत पुढाकार घेतला.










