
चिपळूण : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघणाऱ्या भाविक वारकऱ्यांप्रमाणेच, चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्यही आपली भक्ती सायकलवारीद्वारे व्यक्त करणार आहेत. २७ ते २८ जून या कालावधीत चिपळूण ते पंढरपूर असा तब्बल २८० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे. यंदाची ही चौथी सायकलवारी असून, यामध्ये चिपळूणसह महाराष्ट्रातील विविध भागांतील २० सायकलपटू सहभागी होणार आहेत.
सायकलवारी ही संकल्पना सर्वप्रथम नाशिक सायकल क्लबने सुरू केली. त्यांच्या ३०० ते ४०० सदस्यांनी नाशिकहून पंढरपूरपर्यंत सायकलवरून प्रवास केला होता. त्यातूनच ही अभिनव परंपरा सुरू झाली. चिपळूण सायकलिंग क्लबने ही परंपरा पुढे नेली असून, गेली तीन वर्षे क्लबचे सदस्य नियमितपणे या वारीत सहभागी होत आहेत. यंदाचे आयोजन लातूर सायकल क्लब करीत आहे.
चिपळूण सायकलिंग क्लबचे सहसेक्रेटरी प्रसाद अलेकर व अध्यक्ष विक्रांत अलेकर यांच्या संकल्पनेतून ही सायकलवारी सुरू झाली असून, यावर्षीचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहे. क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत दाभोळकर व मनोज भाटवडेकर यांचाही पुढाकार आहे.
वारीत सहभागी होणारे सायकलपटू :
योगेश ओसवाल, अंकुश जंगम, स्वप्निल गायकवाड, सचिन खेडेकर, अजित जोशी, श्रीकांत जोशी, चैतन्य गांगण, आशिष आयरे, राघव खर्चे, हेमंत भोसले, अथर्व भोसले, मनोज नितोरे, संदीप राणे, शवरी राणे, अमित पेडणेकर, सुयोग शिंदे, पृथ्वी पाटील, राजेंद्र नाचरे, सुयोग पटवर्धन, श्री कदम आदींचा समावेश आहे.
वारीचा प्रारंभ २७ जून रोजी पहाटे ६ वाजता शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होणार आहे. चिपळूण – कुंभार्ली – पाटण – कराड – उंब्रज – विटा हा पहिल्या दिवसाचा मार्ग असून विटा येथे पहिला मुक्काम होणार आहे. दुसऱ्या दिवशी विटा – मसूर – मायणी – दिगंजी – महूद मार्गे पंढरपूर येथे सायकलपटू पोहोचतील.
पंढरपूर सायकल क्लबकडून सर्व सहभागी सायकलपटूंना सहकार्य मिळणार असून, २८ तारखेला विठुरायाच्या दर्शनाने सायकलवारीची सांगता होणार आहे.
ही सायकलवारी केवळ शारीरिक क्षमतेची चाचणी नसून, भक्ती, निसर्गप्रेम आणि एकतेचा संदेश देणारी अनोखी परंपरा ठरत आहे.