खरेदीसाठी ग्राहकांची देवगड बाजारपेठेत गर्दी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 26, 2025 17:01 PM
views 49  views

​देवगड : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांची देवगड बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. गणेशचतुर्थीला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना देवगड बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली. गणेशचतुर्थीला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना गणपतीच्या डेकोरेशनची धावपळ वाढली असून देवगड बाजारपेठ ही इलेक्ट्रॉनिक वस्तू, पडदे, कार्पेट, गणेशोत्सवासाठी लागणारी आरास या साहित्याने सजून गेली आहे.

देवगड मधील बाजारात ग्रामीण भागातून अनेक महिला, पुरुष व्यापारी विविध साहित्य घेऊन येत असतात. यात नारळ, गावठी भाजी,सुपल्या,सुपे, नारळ मंडपि ला बांधण्यासाठी लागणारा  फुलोरात्यामध्येकवंडाळ,कांगन्या,हरणे या वस्तू खरेदीसाठी सुद्धा नागरिकांचा अधिक कल दिसत आहे. गावठी ओले तसेच सुके नारळ,वाल, मुळा, पडवळ , दोडकी, काकडी, चिबुड ही स्थानिक भाज्या आणि फळे विक्रीस मोठ्याप्रमाणात विक्रीस येत आहेत.मंडपीसाठी लागणारे विविध साहित्य ही बाजारपेठे यायला सुरुवात झाली आहे.मार्केट मध्ये विविध प्रकारची फुले, फळे यायला  सुरू झाल्याने हे मार्केट सुद्धा खुलून दिसत आहे.त्याच प्रकारे भजनासाठी व आरती साठी लागणारी साहित्य ढोलकी,तबला, यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.गौरी गणपतीच्या आगमना निमित्त शहरातील बाजारपेठेत लगबग वाढली आहे.खरेदीसाठी अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

​श्री गणेश चतुर्थीचा सण बुधवार, २७ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे.या दिवशी घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल.या उत्सवासाठी घरातील रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि माठीच्या सजावटीसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.गणपतीची मूर्ती विराजमान होणाऱ्या ‘माठी’चे सामान बाजारात दाखल झाले असून, त्याला चांगली मागणी आहे.​गणपतीच्या आगमनापूर्वी ‘माठी’ सजवण्यासाठी विशेष तयारी केली जाते. यासाठी रानफुले, फळे आणि पारंपरिक वस्तूंचा वापर केला जातो. बाजारात या सजावटीसाठी कवडांळ, नारळ, काकडी, शेरवाडे, कांगळ, हरणं, आणि आंबा टाळ अशा विविध वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. या पारंपरिक वस्तूंनी सजवलेल्या माठीखाली बाप्पा विराजमान होतील.​ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्येही कामाची लगबग वाढली आहे. रंगरंगोटी केलेली मूर्ती घरी नेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत आहेत. यंदा प्रचंड महागाई वाढली असली तरी, लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. गोरगरीब जनतादेखील हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करताना दिसत आहे.

​देवगड तालुक्यात गणेशोत्सवाचा माहोल तयार झाला असून, सर्वत्र आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शहरभर उत्सवाचा उत्साहाच वातावरण आहे.