बँकेच्या यशस्वी वाटचालीत ग्राहक आणि ठेवीदारांचा मोठा वाटा : संचालक अनिल करंगुटकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 15, 2022 12:33 PM
views 234  views

वैभववाडी : राजापूर अर्बन बँकने प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याचा नावलौकिक निर्माण झाला आहे. बँक शंभराव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे. योग्य व्यवस्थापनामुळे बँकेच्या दहा शाखा कार्यरत आहेत.संचालक व कर्मचारी यांच्या सांघिक कामाच्या जोरावर या बँकेने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. या बँकेच्या यशात ग्राहकांचे व ठेविदारांचे फार मोठे योगदान आहे. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बँकेचे यशस्वी कामकाज सुरू आहे. लवकरच तरेळे या ठिकाणी नवीन शाखा सुरू होणार आहे. बँकेचे संचालक अनिल करंगुटकर यांनी वैभववाडीत यांनी जाहीर केले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राजापूर अर्बन बँकेच्यावतीने ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. वैभववाडी येथील आदित्य सागर कॉम्प्लेक्स मध्ये हा मेळावा संपन्न झाला.यावेळी वैभववाडी शाखेच्या वतीने माजी सैनिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन प्रमोद रावराणे, बँकेचे संचालक राजेंद्र कुशे, माजी सभापती भालचंद्र साठे, उद्योजक विजय तावडे, नगरसेवक राजन तांबे, हुसेन लांजेकर, प्रा. एस एन पाटील, शाखाधिकारी दुर्गेश बिर्जे, अमोल वायंगणकर, रंगनाथ नागप, आयशा लांजेकर व मान्यवर उपस्थित होते. अनिल करंगुटकर म्हणाले, ग्राहकांच्या सहकार्यातून बँकेच्या एकूण १० शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन शाखा आहेत. दहा शाखांमध्ये वैभववाडी शाखेचा चौथा क्रमांक आहे. भविष्यात ही शाखा पहिला क्रमांक मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्राहक व ठेवीदारांनी बँक प्रशासनाकडून होत असलेल्या चुका देखील सांगितल्या पाहिजेत. त्यात निश्चित सुधारणा केली जाईल. ग्राहक व ठेवीदारांना चांगल्या सेवा सुविधा देणे ही आमची जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीने बचत केलीच पाहिजे. कोरोनात अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. परंतु ज्यांच्याकडे आर्थिक बचत होती. तेच यात तरले हे सत्य आहे. बचत भविष्यासाठी फायदेशीर ठरेल असे सांगितले.

प्रमोद रावराणे म्हणाले, वैभववाडी शाखेचे काम खूपच उल्लेखनीय आहे. शाखेच्या प्रगतीसाठी कर्मचारी व अधिकारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. वैभववाडी तालुक्यात केवळ आणि केवळ याच बँकेचे एटीएम चोवीस तास सुरू असते. याबद्दल बँक प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. भालचंद्र साठे म्हणाले, वैभववाडीतील नागरिक व राजापूर अर्बन बँक यांचं नातं विश्वासाच झाले आहे. ते नातं अधिक घट्ट करण्यासाठी बँकेने वैभववाडीतील एक संचालक घ्यावा असे सांगितले. प्रा. एस. एन. पाटील, उद्योजक विजय तावडे, राजेंद्र खुशे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सैनिक सत्यशोधक राजाराम रावराणे, सुभाष परशुराम वळंजु, विलास महादेव देसाई, बी.सी. बोडेकर, पुंडलिक सिताराम दर्डे, बाजी रुक्माजी पाटील व राजेंद्र चरापले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेट्ये यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखाधिकारी दुर्गेश बिर्जे, संदेश कांबळे, सिद्धेश कुडाळकर, विद्याधर जाधव व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.