
सावंतवाडी : भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ व १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सावंतवाडीमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संसदेमध्ये शुभारंभाचा प्रयोग झालेले, भारतीय संविधानावर आधारित पहिले नाटक "राष्ट्रग्रंथ" आणि संविधानावर आधारित संगीतमय कार्यक्रम होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने सावंतवाडीमध्ये बॅरिस्टर नाथ पै नाट्यगृह येथे १५ व १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना लेखक दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांची असून दोन्ही कार्यक्रमांमध्ये मुंबईतील प्रसिद्ध कलावंतांचा सहभाग आहे.
बुधवार १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता या कार्यक्रम मालिकेचे उद्घाटन होणार असून सांस्कृतिक कार्य व माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मत्स्यव्यवसाय बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, विधानसभा सदस्य निलेश राणे आणि माजी मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक प्रा. प्रवीण बांदेकर, प्रख्यात मालवणी कवी दादा मडकईकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित "राष्ट्रग्रंथ - आधारस्तंभ लोकशाहीचा" या दोन अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे. तब्बल ४० रंगकर्मी, १६ सेट्स आणि ५१ भूमिकांनी सजलेल्या या भव्य नाटकाची संकल्पना दर्शन हिना जगदीश महाजन यांची असून त्यांनीच आर्टिस्टिक ह्यूमन या संस्थेच्या माध्यमातून नाटकाची निर्मिती केली आहे. गुरुवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता "गौरव गाथा संविधानाची" हा भारतीय संविधानाची महती गौरवणारा सर्वत्र गाजलेला संगीतमय कार्यक्रम होणार आहे. प्रख्यात गायक व निवेदक प्रतीक जाधव, प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विजय कर्जावकर, गायिका पूजा सावंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत शशिकांत जाधव या कलाकारांचा सहभाग आहे. संगीत साथ बाळकृष्ण (पप्पू) नाईक, गंधार कदम, अश्विन जाधव, शेखर सर्पे, गौरव पिंगुळकर या कलाकारांनी दिली आहे.
दोन्ही कार्यक्रमांसाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असून अधिकाधिक संख्येने रसिकांनी या दोन्ही उत्तम कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.