
दोडामार्ग : शेतकऱ्याने प्रत्यक्ष बांधावर जावून पीकपाणी नोंद ॲपव्दारे करावी हे शासनाचं धोरण चुकीचं आहे. दोडामार्ग सारख्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता व येथील नेटवर्क सुविधेचा विचार न करता या साऱ्या गोष्टी अशक्य आहेत. याचा नाहक शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे पीकपाण्याची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संदिप गवस यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत त्यांना तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, ॲपद्वारे पिकपाणी नोंदणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली असता होत नाही. नेटवर्क सुविधेचा अभाव असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे यात बराच वेळ वाया जातो. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता व येथील नेटवर्क सुविधेचा विचार करता या साऱ्या गोष्टी अशक्य आहेत. भविष्यातही या गोष्टींचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे ॲपव्दारे नोंदीसाठी ज्या त्रुटी येतात, त्यावर उपाययोजना करून पिकपाणी नोंदणी करण्याच्या सूचना कराव्यात. तोपर्यंत ऑनलाईनने नोंद न करता ऑफलाईन पध्दतीनेच नोंद करावी.
अन्यथा या मागणीसाठी लोकशाही पध्दतीने आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संदिप गवस यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.