
दोडामार्ग : तिलारीत गोमांस वाहतूक संशयावरून झालेल्या मारहाण व कार जाळपोळ प्रकरणातील अकरा संशयितांना न्यायालयाने सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले होते.
गोव्यातील एक युवक गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून काही अज्ञातांनी त्याला मारहाण केली होती. तसेच त्याची कारही पेटवून दिली होती. या मारहाणीत तो युवक गंभीर जखमी झाला होता. त्या संशयित युवकाला पोलिस शिपाई परशुराम सावंत हे दोडामार्ग पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणत असताना ही घटना घडली. यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भाजपा नगराध्यक्ष व तालुका मंडल अध्यक्षांसह पाच संशयितांना अटक केली होती. हे पाच संशयित सध्या चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील इतर ११ संशयितांना पोलिसांनी अटक करत शनिवारी सावंतवाडी येथील न्यायालयात केले होते. न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्याने पोलिस कोठडीत असलेल्या भाजपा युवा मोर्चा दोडामार्ग तालुकाध्यक्ष पराशर सावंत, मंडल उपाध्यक्ष आनंद तळणकर, साटेली भेडशी उपसरपंच यांचे पती गणपत डिंगणेकर, विशाल चव्हाण, प्रदीप गावडे, श्याम गोवेकर, महेश धर्णे, कलैय्या हिरेमठ, अरविंद धर्णे, जयदेव काळबेकर, सिताराम उर्फ राज तांबे या ११ संशयितांना सोमवारी सायंकाळी सावंतवाडी येथील न्यायालयात पुन्हा हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सांगितले.










