
कुडाळ : कुडाळ - घावनाळे येथील दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या खुनाचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल कृष्णा कुंभार (वय २२) राहणार गोठोस, मांडशेत वाडी तालुका कुडाळ, या संशयिताला अटक केली असून, त्याच्या कबुलीनंतर मुलीचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला. कुडाळ-घावनाळे येथील १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी दि. ०२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६:१५ वाजता कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघून गेली होती, मात्र ती परतली नाही.
या घटनेनंतर तिच्या आईने ०३ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य मोठे होते. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तपासासाठी विशेष पोलीस पथके स्थापन केली होती.
या पथकाने मुलीचे कॉल रेकॉर्ड तपासले, मित्रपरिवाराची चौकशी केली, तसेच बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि मुंबई येथील ठिकाणीही चौकशी केली, मात्र, कोणताही ठोस सुगावा हाती लागत नव्हता. सखोल तपास सुरू असताना, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना कुणाल कृष्णा कुंभार (वय २२) याच्या बोलण्यावरून आणि हालचालींवर संशय आला. त्याला संशयित म्हणून अटक करून कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्ह्याची कबुली आणि मृतदेहाची ओळख:
आरोपी कुणाल कुंभार याने मृतदेह ज्या ठिकाणी ठेवला होता, त्या ठिकाणी पोलिसांना घेऊन जाऊन मृतदेह काढून दाखवला.
घटनास्थळी मृत मुलीची आई व बहीण यांनी हजर राहून, तो मृतदेह त्यांच्याच मुलीचा असल्याची ओळख पटवून दिली.
सदर आरोपीस कुडाळ पोलीस ठाण्यातून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने कुणाल कृष्णा कुंभार याला दि. ०६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक सावर्डे, तसेच पोलीस अमलदार कृष्णा केसरकर, कृष्णा परुळेकर, प्रमोद काळसेकर, संजय कदम, योगेश वेंगुर्लेकर, महेश भाई, सखाराम भोई, आनंद पालव, महेश जळवी, रुपेश गुरव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.










