
सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली, सावंतवाडी पथकाने बांदा-दाणोली रस्त्यावर मोठी कारवाई करत अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या एका सहाचाकी वाहनासह अंदाजे 60 लाख 8 हजार 240 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने आज पहाटे बांदा-दाणोली रस्त्यावर, हॉटेल सुभेदारच्या समोर, निमजगा, बांदा येथे संशयित वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली.
सकाळी 06.30 वाजताच्या सुमारास गोव्याहून आंबोलीच्या दिशेने येणारे अशोक लेलँड कंपनीचे सहाचाकी कंटेनर वाहन क्र. MH-14-GU-1237 तपासले असता, त्यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याचा मोठा साठा लपवलेला आढळला.
जप्त मद्यसाठा रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्कीच्या 180 मि.ली. मापाच्या 38,448 बाटल्या होत्या. जप्त मद्याची किंमत अंदाजे 49 लाख 98 हजार 240 रुपये असून वाहतुकीसाठी वापरलेले वाहन अंदाजे 10 लाख रुपये, तसेच एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल मिळून जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 60 लाख 08 हजार 240 रुपये इतकी आहे.
या प्रकरणी, वाहन चालक जसा राम (वय 25, रा. शेरपुरा, लीलसर, बाडमेर, राजस्थान) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता पी.पी. सुर्वे, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग विजय चिंचाळकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये विवेक कदम, दुय्यम निरीक्षक, रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, दिपक वायदंडे, जवान, सतिश चौगुले, जवान, अभिषेक खत्री, जवान, सागर सुर्यवंशी, जवान यांचा समावेश होता.पुढील तपास दुय्यम निरीक्षक, विवेक कदम करीत आहेत.










