कांदळवनातून अमली पदार्थांच्या पिशव्या जप्त

Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2025 16:18 PM
views 138  views

दापोली : दापोली पोलिसांच्या पथकाने मंडणगड तालुक्यातील साखरी येथील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात लपवून ठेवलेल्या ४ अमली पदार्थाच्या पिशव्या जप्त केल्या असून त्यांचे अंदाजे वजन ४.५१ किलो असल्याची माहिती दापोली पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. 

दापोली पोलिसांच्या पथकाने १५ सप्टेंबर रोजी केळशी येथील किनारा मोहल्ला येथील अब्रार डायली याचेकडून ४ लाख रुपये किमतीचा ९९८ ग्राम अमली पदार्थ जप्त केला होता. त्याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता.  दापोली पोलीसानी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने अखिल होडेकर याने केळशी समुद्रकिनारी सापडलेल्या अमली पदार्थाच्या पिशव्यापैकी ३ पिशव्या मला (अब्रार डायली) दिल्या तर उर्वरील ४ पिशव्या या स्वताकडे ठेवल्याची माहिती आब्रार याने पोलिसांना दिली. त्यानंतर दापोली पोलसांनी अखिल होडेकर याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे असलेल्या ४ अमली पदार्थाच्या पिशव्या या साखरी येथील खाडीकिनारी असलेल्या  कांदळवनात टाकून दिल्याची माहिती दिल्यावर काल (ता.२०) रोजी सकाळी दापोली पथक त्याला घेवून साखरी येथे पोचले तेथे त्यांनी कांदळवनामध्ये जावून तपासणी केली असता पोलिसांच्या पथकाला ४ अमली पदार्थाच्या पिशव्या आढळून आल्या. पथकाने पंचनामा करून त्या त्याब्यात घेतल्या.  आतापर्यंतच्या दापोली पोलिसांच्या कारवाईत २२ लाख ९२ हजार ४०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 

या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, उपनिरीक्षक राजकुमार यादव, उपनिरीक्षक महेश पाटील, हेड कॉनस्टेबल मोरे, कॉनस्टेबल कर्देकर, देवकुळे, मडके आदी सहभागी झाले होते. 

आता या प्रकरणात एकूण दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी काही संशयितांची चौकशी सुरु असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक महेश पाटील करत आहेत.