
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेंत असलेल्या विद्यार्थिनीने एका प्राध्यापाकानेच तिचा लैंगिक छळ केल्याची लेखी तक्रार थेट विद्यापीठाचे कुलगुरू यांचेकडे केली असून, कुलगुरूनी या तक्रारीची गंभीर दखल घेत त्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
दापोली येथील कृषी मह्याविद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला घरी बोलावून तिचा लैंगिक छळ एका प्राध्यापकाने केला असल्याची लेखी तक्रार या विद्यार्थिनीने कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांचेकडे केल्यावर त्यांनी गंभीर दखल घेत, ती तक्रार कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचेकडे पाठवून या संदर्भात तातडीने अहवाल मागवला. सहयोगी अधिष्ठाता यांनी लगेच चौकशी करून विद्यापीठ प्रशासनाला अहवाल पाठविल्यावर या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत एका दुसऱ्या महाविद्यालयात तात्पुरती बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासन या संदर्भात चौकशी करून त्या प्राध्यापकाविरोधात योग्य ती कार्यवाहि करेलच पण या विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराची पोलीसातही तक्रार करावी, विद्यापीठ प्रशासन तिच्या पाठीशी राहील असा सल्लाही विद्यापीठ प्रशासनाने त्या विद्यार्थिनीला दिला आहे. मात्र, अद्याप या विद्यार्थिनीने दापोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही.
विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारा हा प्राध्यापक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून तो २ वर्षांनी सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या तक्रारीवर चौकशी करण्यासाठी ३ सदस्यांची समिती नेमण्यात येणार असून हि समिती तक्रार करणारी विद्यार्थीनी व ज्याच्याविरोधात तक्रार आहे ते प्राध्यापक यांची बाजू समजून घेणार असून त्यानंतर आपला अहवाल विद्यापीठ प्रशासनाला देईल व त्यांनतर या प्राध्यापकाविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.