
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील विवाहिता प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील एका महिला राजकीय पदाधिकाऱ्यासह तिच्या मुला विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. माठेवाडा येथील प्रिया चव्हाण हिने राहत्या प्लॅटमध्ये गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती.
या आत्महत्या प्रकरणी प्रिया हिच्या नातेवाईकांसह आई-वडिलांनी संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच काहीजणांविरोधात संशयही व्यक्त केला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व महिला पोलीस अधिकारी सौ माधुरी मुळीक यांनी याबाबत तपास केला. केलेल्या तपासात देवगड तालुक्यातील एका राजकीय महिला पदाधिकारी व त्यांच्या मुलाने तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधीत राजकीय महिला व तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली होती. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता होता. मात्र संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक होणार असल्याचे पोलिस निरिक्षण श्री. चव्हाण यांनी सांगितले.