CRIME | घोटगेवाडी भटवाडी येथे कॉजवेच्या ठिकाणी महिलेचा खून?

मेल्यानंतरही डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न
Edited by: संदीप देसाई
Published on: May 10, 2023 15:48 PM
views 363  views

दोडामार्ग : तालुक्यातील घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्या खाली मंगळवारी रात्री चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा गळा आवळून खून करून नंतर तिचा मृतदेह येथे आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान मंगळवारी रात्री हा प्रकार उघडकीस येता पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली असून उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनीही रात्रीच घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली आहे.

    सदरचा मृतदेह हा सोमवारी पहाटे आणून टाकला असावा असाही कयास वर्तविला जात आहे. दरम्यान श्वानपथक व ठसेतज्ञ यांना पोलीस यंत्रणेने पाचारण केले आहे. पुढील तपास सुरू केला आहे. त्या महिलेचा चेहरा विद्रुप करण्यात आल्याने सदरच्या महिलेची ओळख पटविण्यात अडचणी येत असून पोलिसांसमोर या प्रकारचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , घोटगेवाडी येथील पुरोहित श्री.मणेरीकर हे सोमवारी संध्याकाळी गुरांना घेऊन नदीकाठावर पाणी पाजण्यासाठी आले असता त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. लागलीच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी , सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर फौंजफाट्यासहित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून तिच्या अंगावर लाल रंगाचा कुर्ता परिधान केल्याचे आढळून आले. तिच्या हातात एक सोन्याची बांगडी तर हाताच्या बोटात एक अंगठी आढळून आली आहे. शिवाय चपलाही आढळून आल्या आहेत. मात्र सदरच्या महिलेचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला असल्याने ओळख पटली नाही. दरम्यान या घटनेचं गांभीर्य ओळखून  सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सदरचा मृतदेह हा मारेकऱ्याने गळा आवळून खून केल्यानंतर गाडीतून आणून टाकला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. इतकेच नव्हे तर सदर मृतदेह ओढत नेऊन टाकल्याच्या घटनास्थळी खुणा

खून केल्यानन्तर मृतदेह गाडीतून आणून तो कॉजवेच्या डाव्या बाजूने टाकण्याचा खुन्याने प्रयत्न केल्याचे धागेदोरे घटनास्थळी आढळून आले आहेत. मात्र महिलेची शरीरयष्टी मोठी असल्याने त्याला मृतदेह उचलून संरक्षक कठड्यावरून खाली टाकणे शक्य झाले नाही परिणामी त्याने तो ओढत नेऊन कॉजवेच्या उजव्या बाजूला नेऊन टाकल्याचे अंदाज वर्तविला जात आहे. 

इतकेच नव्हे तर खुन्याने महिलेचा चेहरा विद्रुप करण्यासाठी वापरलेला दगडही घटनास्थळीच आढळून आला असून त्याच्यावर रक्ताचे डाग सापडले आहेत.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक दाखल...

खुनाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अणवेशन विभागाचे पथक सोमवारी रात्रौ १२ वा. घोडगेवाडीत दाखल झाले. पोलीस निरीक्षक संदीप भोसले, महेंद्र घाग, श्री.केसरकर, रवी इंगळे आदीनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

दरम्यान या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली असून अनेक तर्क वितर्क लढविले जात आहे. महिलेचे ओळख पटविण्यासाठी परिसरातील वा तालुक्यातील महिला कुणी बेपत्ता असलेबाबत सुद्धा पोलीस तपास घेत आहेत.