
कणकवली : सावडाव येथे वीज महावितरणची परवानगी न घेता, महावितरणची बनावट कागदपत्रे वापरून स्ट्रीटलाईटचे काम केल्याबाबत सावडावचा तत्कालीन सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक तसेच श्री प्रेम इंडिस्ट्रीज सोलापूरचा ठेकेदार सुभाष भंडारी अशा तिघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१७ ते २०२२ या कालावधीत घडली असल्याचे वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास यशवंतराव बगडे (४८, कणकवली बिजलीनगर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, वरील संशयितांनी संगनमताने सावडाव गावातील गावठणवाडी ते धबधबा तसेच तेलीवाडी, टेंबवाडी, डगरेवाडी, खांदारवाडी, झरवाडी, पुजारेवाडी येथे स्ट्रीटलाईटचे काम केले. मात्र, त्यांनी महावितरणची मंजूरी घेतलेली नसून महावितरणची बनावट कागदपत्रे वापरून सदरची कामे केली. असे निदर्शनास आले. त्यानुसार संशयितांवर भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.