लाडकी बहीण योजना यशस्वीतेचे श्रेय अंगणवाडी सेविकांचे

आमदार नितेश राणेंकडून अंगणवाडी सेविकांच कामाचं कौतुक
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 27, 2024 15:03 PM
views 207  views

वैभववाडी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तालुक्यात प्रभावीपणे राबविली जात आहे.ही योजना तळागाळातील महिलांपर्यत अंगणवाडी सेविकांनी पोहचवली आहे.त्यांच्यांमुळे मुख्य उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. त्यामुळे ही योजना यशस्वीतेचे खरे श्रेय त्यांचेच आहे असे सांगत आमदार नितेश राणे यांनी अंगणवाडी सेविकांचे तोंडभरुनज्ञ कौतुक केले.

येथील पंचायत समिती सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आढावा आमदार श्री.राणे यांनी घेतला.यावेळी व्यासपीठावर प्रांतधिकारी जगदीश कातकर,तहसिलदार सुर्यकांत पाटील,गटविकास अधिकारी आर.डी जंगले,मुख्याधिकारी सुरज कांबळे आदी उपस्थित होते.

प्रांतधिकारी श्री.कातकर यांनी लाडकी बहीण योजनेच्या अमंलबजावणीविषयीची माहीती दिली.आतापर्यत वैभववाडी तालुक्यातुन ७ हजार ३०० महिलांनी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली असल्याचे त्यांनी सांगीतले.त्यानतंर आमदार श्री.राणे यांनी ही योजना अधिकाधिक महिलापर्यत पोहोचविण्यात यावी.ज्या गावात सर्वाधिक नोंदणी केली जाईल त्या गावाला २५ लाखांचा विकास निधी देण्यात येईल.याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या गावांना १५ आणि १० लाखांचा विकास निधी देण्यात येणार असल्याचे आमदार श्री.राणे यांनी जाहीर केले.ही योजना तालुक्यात खुप चांगल्या पध्दतीने राबविली जात आहे.त्याचे सर्व श्रेय अंगणवाडी सेविकांना जात असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.यावेळी काही सरपंचानी ही योजना राबवित असताना येणाऱ्या समस्यां आमदार श्री.राणे यांच्यासमोर मांडल्या.त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ तोडगा काढण्याच्या सुचना आमदारांनी दिल्या.तसेच १५दिवसांनंतर या योजनेच्या कामकाजाचा पुन्हा आढावा घेतला जाईल असे त्यांनी सभेत सांगितले.