'स्टेपिंग स्टोन'मध्ये विद्यार्थ्यांना शारिरीक - मानसिक विकासावर आधारित समुपदेशन

Edited by: विनायक गावस
Published on: July 25, 2023 20:09 PM
views 195  views

सावंतवाडी : इयत्ता ५ वी च्या विद्यार्थी व  विद्यार्थीनींसाठी विद्यार्थ्यांचा 'सुरवंटा पासून ते फुलपाखरा' पर्यंत होणारा प्रवास करताना त्यांच्या शारीरिक व मनसिक बदलांना अनुसरून समुपदेशन करण्यात आले.

या कार्यक्रमात उपस्थित सर्व तज्ज्ञांचे तसेच शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले गेले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. समुपदेशक आणि कुडाळच्या साईरूप रुग्णालयात मानसविकारतज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मोहिनी वज्राटकर व  स्त्रीरोग तज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर स्त्रीरोग तज्ञ डॉ. भक्ती सावंत यांनी विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन केले

. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींचे दोन वेगवेगळे गट करून त्यांना शारिरीक वाढ होताना विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या शारिरीक बदला प्रमाणे त्यांच्या मानसिकतेत कसा बदल होतो याचेही योग्य मार्गदर्शन केले. जसे कळीचे रूपांतर फुलामध्ये होताना ती नाजूकच असते. त्याप्रमाणेच कौमार्यावस्थेत प्रवेश करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला नाजूक कळीप्रमाणे योग्य मार्गदर्शन केले. तसेच या सर्व तज्ञांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

विद्यार्थ्यांना या शारिरीक व मानसिक बदलातून जाताना ते बदल स्विकारून आपले ध्येय कसे गाठावे हे स्पष्ट करून सांगितले. अशाप्रकारे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना शारिरीक व मानसिक विकासावर आधारित समुपदेशन कार्यक्रम पार पाडण्यात आला.