पालकमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा !

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट
Edited by: संदीप देसाई
Published on: December 22, 2023 14:21 PM
views 291  views

सिंधुदुर्ग : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञांची नेमणूक करावी, जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात कोविड तपासणी किट, ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, आरटीपीसीआर लॅब या सर्वबाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही ? याची  खात्री करावी. नियमित माहितीचा डॅशबोर्ड बनवावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील यांनी सद्यस्थिती, करण्यात येणाऱ्या उपाय योजना आणि औषधीसाठ्याची माहिती पालकमंत्री यांना दिली.