
दोडामार्ग : तळेखोल मुख्य रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम ठेकेदाराने पूर्ण केले. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंती न बांधल्यामुळे याचा फटका लगत जमीन असलेल्या नागरिकांना होणार होता. याबाबत आज तळेखोल उपसरपंच महादेव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होत तत्काळ संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात केली.
तळेखोल येथील मुख्य रस्त्यावरील पुलाचे बांधकाम झाले होते. मात्र पूलालगतची संरक्षण भिंत ठेकेदाराने अजूनही बांधून दिलेली नाही. पुला लगतची सर्व कामे अपूर्ण स्थितीत आहेत. पुलाचे काम सुरू करत असताना पर्यायी रस्त्यासाठी तसेच जलद गतीने काम सुरु व्हावे यासाठी पर्यायी रस्त्यासाठी काजूची झाडे त्याचबरोबर संरक्षक भिंत तोडण्यात आली होती. त्याचबरोबर पुला लगतच्या गणेश गौरी तळी विसर्जन पायऱ्या देखील तोडण्यात आल्या होत्या. यावेळी तेथील शेतकऱ्यांनी काजूच्या झाडांचा मोबदला न मागता असलेली संरक्षक भिंत पुढे वाढवून द्या अशी मागणी केली असता तसे आश्वासन ठेकेदाराकडून देण्यात आले होते. परंतु आतापर्यंत संरक्षक भिंत, शेतकऱ्यांने वाढवून मागितलेली संरक्षक भिंती, गणेश गौरी तळी विसर्जन पायऱ्या, तळेखोल गावातील मुख्य नळ योजनेची पाईपलाईन यासारखी सर्व कामे अपूर्ण स्थितीत आहेत. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अजून देखील झालेली नव्हती,पावसाळा तोंडावर आला असून तत्काळ कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थांसोबत सार्वजनिक बांधकाम येथे गुरुवार दि-२२ मे रोजी उपोषणाला बसणार असून ठेकेदारावर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू राहील असे पत्र तळेखोल उपसरपंच महादेव नाईक यांनी आज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. या वेळी सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस, सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अनिल शेटकर, साटेली - भेडशी सरपंच छाया धर्णे, तेरवण मेढे सरपंच गवस तसेच तसेच इतर सरपंच उपसरपंच उपस्थित होते.
बांधकाम विभागाने तत्काळ या पत्राची दखल घेत संरक्षक भिंत बांधण्या साठी तेथे खडी टाकत कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.