
वेंगुर्ले : राजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. मात्र, आजची स्थिती फार गंभीर आहे. समाजात पसरत चाललेली अराजकता पाहता भविष्यात देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहिल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आपला देश लोकशाही तत्वावर चालतो. लोकशाही ज्या संविधानावर आधारली आहे ते संविधानही धोक्यात आले आहे. त्यामुळे समतेच्या पुरस्कारासाठीच वेंगुर्त्यात संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आयोजित केलेल्या रथ समतेचा समूहगायन स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, अशी माहिती फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी व्यक्त केले.
पत्रकार संघाच्या कार्यालयात ते बोलत होते. फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे सल्लागार प्रदीप सावंत, पदाधिकारी लाडू जाधव, योगेश तांडेल, अजय गडेकर, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे अध्यक्ष महेंद्र मातोंडकर आदी यावेळी उपस्थित होते. एप्रिल महिना हा खऱ्याअर्थाने सामाजिक क्रांतीचा महिना म्हणावा लागेल. कारण याच महिन्यातील ११ तारिखला क्रांतीसूर्य महात्मा फुले व १४ तारिखला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. यावर्षी संविधानाला ७५ वर्षे पूर्ण आहेत. यानिमित्ताने देशभर शासकीय व संस्था पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख व संविधान म्हणजे काय? याची जाणीव नव्या पिढीला व्हावी यासाठी फुले शाहू आंबेडकर विचारमंच, अपरान्त साहित्य कला प बोधिनी शाखा वेंगुर्ले आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. महामानवांची जयंती व संविधान अमृत महोत्सव असे स्वरूप असलेल्या अभियानातील १२ मार्च रोजी आयोजित केलेल्या रथ समतेचा समूह गायन स्पर्धेलाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे.
येथील साई मंगल कार्यालयात दुपारी ठिक ३ वाजता होणाऱ्या या स्पर्धेत जिल्हभरातील १७ संघ सहभागी झाले आहेत. यात मालवण येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच, आम्रपाली ग्रुप बांदा, पंचशील महिला समूह सरमळे, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, वेतोरे सिद्धार्थवाडी ग्रुप, प्रज्ञासूर्य ग्रुप आसोली, भीमसूर्यक्रांती महिला समूह नेमळे, उत्कर्ष महिला मंडळ आडेली, भिमा ज्ञा ग्रुप आजगाव, रमाई महिला समूह निरवडे, रमाई कलाविष्कार ग्रुप मडुरा, कलासंगम पणदूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणाभूमी सावंतवाडी, एकता महिला समूह मळगाव, रमाई समूह गट सातार्डे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर कोनापाल व पंचशील महिला समूह सातार्डे या संघांनी सहभाग दर्शविला आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्गचे सहआयुक्त संतोष चिकणे, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, कार्याध्यक्ष इंजि. अनिल जाधव, भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्गचे आनंद कासार्डेकर, ज्येष्ठ साहित्यिक तथा कोमसाप सिंधुदुर्गचे सचिव विठ्ठल कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणाभूमी सावंतवाडीचे पदाधिकारी मोहन जाधव, समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अपरान्तचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष तथा फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे सचिव महेंद्र मातोंडकर व स्पर्धा प्रमुख लाडू जाधव यांनी स्पर्धेच्या नियोजनासाठी मेहनत घेतली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून समतेच्या गीतांचा जागर होणार आहे. आपल्या भावी पिढीला संविधानाचे महत्व कळावे, महामानवांचे स्मरण त्यांना सतत रहावे यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाभरातील संविधानप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी, असे आवाहनही यावेळी बोलताना चमणकर यांनी केले.