संविधान पुस्तिका विटंबन प्रकरण ; दोषींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

अंकुश जाधव यांचं नितेश राणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन
Edited by: विनायक गांवस
Published on: December 12, 2024 16:45 PM
views 232  views

सावंतवाडी : परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबनेच्या प्रकरणातील दोषीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,  अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी गुरुवारी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. सावंतवाडी दौऱ्यावर आलेल्या आमदार नितेश राणे यांची अंकुश जाधव यांनी भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.      

परभणी  जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील 'जगातील सर्वात मोठे ' असा गौरव केल्या जाणाऱ्या संविधान शिल्पाची काचे फोडून तोडफोड करत एका समाजकंटकाने विटंबना केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभारत उमटत आहेत. ही घटना अतिशय निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. या घटनेचा जलद गतीने तपास करून दोषीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती यावेळी अंकुश जाधव यांनी दिली.  या घटनेमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच हा भारतीय संविधानाचाही हा अवमान आहे. त्यामुळे या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरायत उमटले अहेत. भारताचे नागरिक म्हणून आम्ही संविधानचा अवमान सहन करणार नाही. संविधानाप्रति प्रत्येकाने आदर आणि प्रामाणिक असायलाच हवं. मात्र, काही समाजकंटक अशी निंदनीय देशविरोधी कृत्य करत आहेत. अशा समाज द्रोह्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करावा म्हणजे भविष्यात अशी कृत्य करण्यास कोणीच धजावणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहोत. आमच्या भावना लक्षात घेऊन दोषीवर कडक कारवाई करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे करीत आहोत, असे निवेदनात माजी सभापती तथा जिल्हा भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी म्हटले आहे.